Facebook Jobs In India : आर्थिक मंदीचा परिणाम जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर ही झाल्याचं दिसत आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटाच्या तिमाही कमाईत घट झाली आहे. ज्याचा परिणाम आता कर्मचाऱ्यांच्या भरतीवर होणार आहे. मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले की "आम्हालाही मंदीचा धक्का बसला आहे. याचा डिजिटल जाहिरात व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच मेटा आता खर्च कमी करण्यावर भर देत असून पुढील वर्षी कंपनी नवीन कर्मचाऱ्यांच्या भरतीचा वेग कमी करेल.
कर्मचारी भरती 30 टक्क्यांनी कमी होईल
27 जुलै रोजी मेटाने आपल्या कमाईचा तिमाही अहवाल प्रसिद्ध केला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा महसूल 1 टक्क्यांनी कमी होऊन 28.8 बिलियन डॉलर्स झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत महसूल 29.1 बिलियन डॉलर्स होता. मे महिन्यात कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचे संकेतही मेटाने दिले होते. मार्क झुकरबर्ग यांनी जुलैच्या सुरुवातीला मेटा कर्मचार्यांना सूचित केले की, कंपनी यावर्षी 30 टक्के कमी कर्मचारी नियुक्त करेल.
मार्क झुकरबर्ग यांनी मेटाच्या कमाईच्या कॉन्फरन्स कॉलला संबोधित करताना सांगितले की, इतिहासात पहिल्यांदाच मेटाच्या कमाईत घट झाली आहे. डिजिटल जाहिरातींची जागा कमी झाल्यामुळे हे घडले आहे. ते म्हणाले की, “कंपनी पुढील वर्षी 2023 पर्यंत कर्मचाऱ्यांची संख्या सातत्याने कमी करणार आहे. मेटामधील अनेक टीम लहान असतील, जेणेकरून त्यांची ऊर्जा इतरत्र वापरली जाऊ शकेल. आम्हाला कंपनीच्या टीम लीडरची संख्या वाढवायची आहे. तसेच त्यांना टीमची पुनर्रचना करण्याचे स्वातंत्र्य द्यायचे आहे.
झुकरबर्ग म्हणाले की, कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या पुढील काही तिमाहींमध्ये स्थिर राहील. कारण या वर्षी आम्ही अनेक कर्मचाऱ्यांना कामावर घेतले आहे. मात्र भरती प्रक्रिया आणखी मंदावली जाणार आहे. मंदीचा हा काळ किती दिवस चालेल, हे सांगता येत नाही. पण गेल्या तिमाहीपेक्षा पुढे त्याचा अधिक परिणाम होईल हे निश्चित.