Ethanol Vehicle : ऑगस्ट महिन्यात देशभरात 100 टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या गाड्या लॉन्च करण्याचा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. बिझनेस टाइम्स बाजार या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार 29 जून रोजी एका मुलाखतीत नितीन गडकरींनी इथेनॉलच्या गाड्यांचा दावा केला आहे. गडकरींच्या म्हणण्यानुसार, शंभर टक्के इथेनॉलवर आधारित गाड्या रस्त्यांवर धावणं हे देशातील क्रांतिकारी पाउल असेल, या गाड्या पूर्णपणे इम्पोर्ट-ऑप्शन, कॉस्ट इफेक्टिव्ह, प्रदूषणरहित आणि स्वदेशी बनावटीच्या असणार आहेत.


इथेनॉल-पेट्रोलच्या किंमतीतला फरक


आत्ताच्या घडीला देशभरात पेट्रोलची किंमत एका लिटरसाठी जवळपास 108 रुपयांच्या घरात आहे. तर इथेनॉलला एका लिटरसाठी 66 रुपये मोजावे लागतात. याच पार्श्वभूमीवर ऑगस्टपासून जर नितीन गडकरींनी केलेल्या दाव्याप्रमाणे इथेनॉलवर आधारित गाड्या धावू लागल्या तर तो दुचाकी आणि चारचाकीसाठी मोठा पर्याय ठरणार आहे.


बजाज, TVS आणि हीरो या बड्या कंपन्यांनी 100 टक्के इथेनॉलवर आधारित दुचाकी तयार केलेल्या आहेत. गडकरींच्या मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार टोयोटा कंपनीच्या कॅमरी कारप्रमाणे 60 टक्के पेट्रोल आणि 40 टक्के विजेवर धावणाऱ्या वाहानांप्रमाणेच, देशभरात आता 60 टक्के इथेनॉल आणि 40 टक्के विजेवर धावणारी वाहनं तयार केली जातील.


इथेनॉल काय आहे? त्याचा उपयोग काय?


इथेनॉल हे एक प्रकारचं अल्कोहोल असून जो स्टार्च आणि साखरेच्या किण्वनातून बनवलं जातं. इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळलं जातं, त्याचप्रमाणे वाहनांमध्ये पर्यावरणास अनुकूल इंधन म्हणून ते वापरलं जातं.


इथेनॉल तीन जनरेशन


इथेनॉल प्रामुख्यानं उसाच्या रसापासून तयार होतं. परंतू कॉर्न, कुजलेले बटाटे, कुजलेल्या भाज्यांच्या स्टार्चयुक्त पदार्थांपासून इथेनॉल तयार केलं जाऊ शकतं. साधारणपणे फर्स्ट जनरेशनचं इथेनॉल उसाचा रस, गोड बीट, कुजलेला बटाटा, गोड ज्वारी आणि कणसापासून बनवलं जातं. तर दुसऱ्या जनरेशनचं इथेनॉल सेल्युलोज आणि लिग्रोसेल्युलोसिक पदार्थ म्हणजेच तांदळाचा, गव्हाचा कोंडा, कॉर्नकोब, बांबू आणि वुडी बायोमासपासून बनवलं जातं. 


शेवाळापासून तिसऱ्या पिढीचं जैवइंधन तयार करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी आणि इंधनाचे दर कमी करण्यासाठी जगभरातील सरकारे इथेनॉल मिश्रित इंधनावर काम करत आहेत. तर भारतातही पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉलकडे पाहिलं जात आहे.


ही बातमी वाचा: