नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच एम्पलॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशननं नोव्हेंबर महिन्याचा पे रोल डेटा जाहीर केला आहे. या डेटानुसार नोव्हेंबर महिन्यात ईपीएफओच्या मेंबर्स ची संख्या 14 लाख 63 हजारांनी वाढली आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये 9.07 टक्के वाढ झाल्याचे पहायला मिळाले.
नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत नोव्हेंबर 2024 मध्ये पेरोल डेटा नुसार 4.88 टक्के वाढ पाहायला मिळाली. या आकडेवारीनुसार देशात संघटित क्षेत्रात नोकऱ्या वाढत असल्याचं पाहायला मिळतं. कर्मचाऱ्यांमध्ये ईपीएफओ सोबत जोडले जाण्यासह त्यापासून मिळणाऱ्या लाभांबद्दल जागरूकता वाढली आहे, असं म्हटलं जातंय.
ईपीएफओसोबत नोव्हेंबर महिन्यात 8.74 लाख सदस्य जोडले गेले. ऑक्टोबर 2024 मध्ये नव्यानं नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत ही वाढ 16.58 टक्का पाहायला मिळाली. तर नोव्हेंबर 2023 च्या तुनलेत नोव्हेंबर 2024 मध्ये 18.80 टक्के वाढ दिसून आली.
ईपीएफओच्या आकडेवारीनुसार नव्यानं जोडल्या गेलेल्या खातेदारांमध्ये 18 ते 25 वर्षांदरम्यान वय असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. नोव्हेंबरमध्ये नव्यानं नोंदणी झालेल्या सदस्यांपैकी 54.97 टक्के सदस्य 18 ते 25 वयोगटातील आहेत. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये यामध्ये 9.56 टक्के वाढ झाली आहे. याशिवाय नोव्हेंबर 2023 मध्ये 18 ते 25 वयोगटातील जितके सदस्य जोडले गेले होते त्याच्या 13.99 टक्के अधिक नोंदणी नोव्हेंबर 2024 मध्ये झाली आहे.
पेरोल डेटाच्या आकडेवारीनुसार 14.39 लाख कर्मचारी ईपीएफओतून बाहेर पडले होते. ते पुन्हा ईपीएफओशी जोडले गेले आहेत. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये 11.47 टक्के वाढ झाल्याचं पाहायला मिळतं.
पेरोल डेटाचं विश्लेषण केलं असता नोव्हेंबर 2024 मध्ये ज्या खातेदारांनी ईपीएफओ जॉईन केलं त्यामध्ये 2.40 लाख महिलांची संख्या आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत या आकडेवारीत 14.94 टक्क्यांची वाढ झाली आहे. वार्षिक आकडेवारी पाहिली असता त्यामध्ये 23.62 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
राज्यनिहाय आकडेवारी पाहिली असता पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून नोंदणीची टक्केवारी 59.42 टक्के आहे. पाच राज्यांमध्ये सदस्यांची संख्या 8.69 लाख इतकी आहे. सर्वाधिक ईपीएफओ सदस्यांची संख्या जोडण्यात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये महाराष्ट्रातून 14 लाख 63 हजारांच्या तुलनेत 20.86 टक्के सदस्य जोडले गेले आहेत.
दरम्यान, येत्या काळात ईपीएफओकडून खातेदारांच्या सोयीसाठी अनेक बदल केले जाणार आहेत. त्यामध्ये खातेदारांना पीएफ खात्यातील रक्कम एटीम कार्डद्वारे काढण्याची सोय उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
इतर बातम्या :