नवी दिल्ली : कोरोना महामारी दरम्यान, प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रॉविडंट फंड (PF) म्हणजेच, भविष्य निर्वाह निधीतून जवळपास 40 हजार कोटी रुपये काढले आहेत. श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत यासंदर्भात माहिती दिली. कोरोनाकाळात पीएफ काढण्याची मुभा सरकारने दिली होती. अशातच भविष्य निर्वाह निधीतून सर्वाधिक 7 हजार 838 कोटी महाराष्ट्रातून काढण्यात आले आहेत.


सरकारकडून कोरोना काळात पीएफ काढण्याची मुभा


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यादरम्यान अनेकांचे उद्योगधंदे बंद होते. तर अनेकांच्या हातातील कामंही गेलं होतं. त्यावेळी कोरोना काळात ईपीएफओ (एम्प्लॉई प्रॉविडंट फंड ऑर्गनायजेशन) मधून 39 हजार 403 कोटी रुपये काढण्यात आले आहेत. यामागील कारण म्हणजे, कोरोना महामारीच्या काळात कर्मचाऱ्यांना पीएफमधून पैसे काढण्याची मुभा देण्यात आली होती. त्याचाच फायदा लोकांनी घेतला आहे. पीएफमधून पैसे काढण्याचा हा आकडा 25 मार्च ते 31 ऑगस्ट 2020 पर्यंतचा आहे.


सर्वाधिक महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी पीएफमधून पैसे काढले


भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्यात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 7838 कोटी रुपये कर्मचाऱ्यांनी पीएफमधून काढले आहेत. पीएफमधून पैसे काढण्यात महाराष्ट्रानंतर कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तमिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे.


पीएफवर सरकारची योजना


तीन महिन्याचं वेतन आणि डीएच्या बरोबरीची रक्कम किंवा पीएफ खात्यामध्ये जमा झालेली एकूण रक्कमेपैकी 75 टक्के रक्कम काढण्याची मुभा सरकारने कर्मचाऱ्यांना दिली आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात चौथ्या स्थानी