मुंबई : एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनीचा आयपीओ उद्या लिस्ट होणार आहे. विशेष बाब म्हणजे या कंपनीच्या आयपीओला 89 पट सबस्क्राइब करण्यात आला आहे. एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनीचा आयपीओ 29 नोव्हेंबरला बाजारात लिस्ट होत असल्यानं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या कंपनीच्या आयपीओला ग्रे मार्केट प्रीमियमवर 39 टक्के ट्रेड दाखवत आहे. जीएमपीनुसार आयपीओ लिस्ट झाल्यास गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे.
200 रुपयांवर शेअर लिस्ट होणार?
एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनीच्या आयपीओ शेअरची किंमत 148 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओचा जीएमपी 39 टक्के म्हणजेच प्रति शेअर 57 रुपये दाखवत आहे. यानुसार आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होत असताना 205 रुपयांना लिस्ट होऊ शकतो. ज्यांना आयपीओ अलॉट झाला आहे त्यांना चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.
एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्सचा आयपीओ 89.90 पट सबस्क्राइब झाला आहे. कंपनीनं निश्चित केल्या प्रमाणं एका लॉटमध्ये 101 शेअर आहेत. ज्या गुंतवणूकदारांना आयपीओ अलॉट झाला आहे त्यांच्या खात्यात 101 शेअर क्रेडिट करण्यात आले आहेत. जीएमपीनुसार एका शेअरला 57 रुपये अधिक मिळाल्यास एका लॉटमागं गुंतवणूकदारांना 5700 रुपयांपर्यंत परतावा मिळू शकेल. एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्सच्या आयपीओद्वारे 3,07,93,600 शेअर जारी केले जाणार आहेत अशी माहिती आहे. त्यापैकी 2,76,83,13,747 शेअरसाठी बोली लागली आहे.
पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून या आयपीओला 157.05 पट सबस्क्राइब करण्यात अलं आहे. गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून देखील 153.80 पट बोली लावण्यात आली आहे. रिटेल गुंतवणूकदारांकडून 24.48 पट सब्सक्राइब करण्यात आलं आहे. एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनीनं अँकर इनवेस्टर्सकडून 195 कोटी रुपये उभारले आहेत. आयपीओच्या माध्यमातून 650 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न आहे. कंपनीनं आयपीओद्वारे 3 कोटी 87 लाख इ्क्विटी शेअर जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर प्रवर्तकांकडून 52.68 लाख शेअरच्या विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या पुन्हा वाढली आहे. गुंतवणूकदारांनी मोठ्या कंपन्यांच्या आयपीओकडे मात्र पाठ फिरवल्याचं देखील पाहायला मिळालं होतं.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)