E-Shram Card : देशातील सर्वाधिक कामगार असंघटीत क्षेत्रात काम करतात. कोरोना महासाथीत लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर बेरोजगार झाले. रोजंदारीवर असलेल्या कामगारांनी शहरांमधून गावाकडे स्थलांतर करण्यास सुरुवात केली. हातावर पोट असलेल्या लाखो नागरिकांचे हाल झाले. ही बाब लक्षात घेऊन केंद्रातील मोदी सरकारने या कष्टकरी मजुरांसाठी विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव ई-श्रमिक कार्ड योजना आहे. या योजनेतंर्गत सरकार श्रमिक मजुरांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देण्यात येते. कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, या योजनेत आतापर्यंत 24 कोटी मजुरांनी नोंदणी केली आहे. देशातील सर्व 38 कोटी मजूर या योजनेशी जोडले जावेत, असे सरकारचे लक्ष्य आहे.
ई-श्रमिक कार्ड योजनेत नोंदणी करूनही अनेकांना या योजनेचा लाभ मिळत नाही. ई-श्रमिक कार्ड योजनेचा फॉर्म नाकारण्याची अनेक कारणे असू शकतात. जर तुमचा अर्जही वारंवार नाकारला जात असेल, तर त्यापैकी पुढील काही कारणे असू शकतात.
> ई-श्रम कार्ड बनवताना कामगारांना विविध प्रकारची कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले जाते. यामध्ये आधार कार्डची प्रत, बँक खात्याचे तपशील, मोबाईल क्रमांक इत्यादी तपशील अपलोड करण्यास सांगितले आहे. तपशील अपलोड करताना तुमच्याकडून काही चूक झाली, तर अशा परिस्थितीत तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो.
> ई-श्रमिक कार्ड अर्ज नाकारण्याचे दुसरे सर्वात मोठे कारण हे असू शकते की तुम्ही आधीच कामगार मंत्रालयाच्या कोणत्याही योजनेचे लाभार्थी आहात. कोणत्याही प्रकारच्या सरकारी योजनेचा लाभार्थी ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकत नाही. असे केल्यास तुमचा अर्ज नंतर रद्द केला जाईल.
> केवळ असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर ई-श्रमिक कार्ड योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. पगार असणारे आणि असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक यासाठी पात्र नाहीत. जर तुम्ही संघटित क्षेत्रातील पगारदार व्यक्ती असाल आणि या योजनेसाठी अर्ज केलात तर अशा परिस्थितीतही तुमचा अर्ज रद्द केला जाईल.
> जर एखादी व्यक्ती कोणत्याही प्रकारची सरकारी पेन्शनधारक असेल तर त्यालाही या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. या योजनेत पेन्शनधारकाने अर्ज केल्यास त्याचा अर्जही रद्द केला जाईल.
> यासोबतच पीएफ खातेदारही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. यासोबतच आयकर रिटर्न भरणाऱ्या लोकांचे फॉर्मही नाकारले जातील.