नवी दिल्ली :  पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे (PM Ujjwala Yojana) लाभार्थी आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी असलेल्या एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात (LPG Cylinder Price) केल्याचा परिणाम दिसू लागला आहे. केंद्र सरकारच्या एलपीजी सिलेंडरवरील अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याच्या निर्णयानंतर देशात एलपीजी सिलेंडरच्या मागणीत विक्रमी वाढ झाली आहे.


29 ऑगस्ट 2023 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणि सामान्यांसाठी LPG सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त केले. सरकारच्या या निर्णयानंतर सप्टेंबर महिन्यात दररोज रिफिल होणाऱ्या एलपीजी सिलेंडरची सरासरी संख्या 11 लाखांच्या पुढे गेली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये, पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एलपीजी आणखी 100 रुपयांनी स्वस्त करण्यात आला. त्यानंतर, ऑक्टोबरमध्ये एलपीजी गॅसची मागणी वाढली असल्याचे दिसून आली आहे. एलपीजी सिलेंडर रिफिलच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते.


पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी केल्या. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजी सिलेंडर 500 रुपयांनी स्वस्त म्हणजेच 600 रुपयांना मिळत आहे. उर्वरित एलपीजी ग्राहकांना त्यांचे एलपीजी सिलेंडर रिफिल करण्यासाठी 900 रुपये द्यावे लागतील, तर यापूर्वी त्यांना 1100 रुपये द्यावे लागत होते.


केवळ केंद्र सरकारच नाही तर अनेक राज्यांनीही त्यांच्या राज्यांमध्ये एलपीजी सिलेंडर स्वस्त केले आहेत. राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केवळ 500 रुपयांमध्ये सिलेंडर देत आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत सिलेंडर देण्याची घोषणा केली आहे. मध्य प्रदेशच्या शिवराज सरकारनेही 450 रुपयांना सिलेंडर देण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये एलपीजी सिलेंडर 500 रुपयांना देण्याचे आश्वासन दिले आहे.



1 मे 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळवण्याच्या उद्देशाने मोफत एलपीजी कनेक्शन देण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. या योजनेचे एकूण 9.59 कोटी सक्रिय लाभार्थी आहेत. योजना सुरू होऊन सात वर्षांहून अधिक काळ लोटला असताना, एलपीजी सिलेंडरच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या कमी झाली होती. सरकारी आकडेवारीनुसार, पीएम उज्ज्वलाच्या लाभार्थ्यांना महागड्या एलपीजीमुळे त्यांचे सिलेंडर रिफिल होत नव्हते. 2022 मध्ये, सरकारने संसदेत सांगितले की, गेल्या पाच वर्षांत, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 4.13 कोटी लाभार्थ्यांनी एकही एलपीजी सिलेंडर रिफिल केलेला नाही. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे एकूण 7.67 कोटी लाभार्थी आहेत ज्यांनी फक्त एक एलपीजी सिलेंडर रिफिल केला होता.