Share Market Update : दिवाळीचा सण शेअर बाजार (Share Market) आणि बाजारातील गुंतवणूकदारांसाठी खास असतो. हा सण बाजारासाठी नवीन वर्षाची सुरुवात दर्शवितो. आजच्या दिवशी विक्रम संवत 2079 संपून संवत 2080 ला सुरूवात झाली आहे. पण गेल्या वर्षभराचा कालावधी हा शेअर बाजारासाठी खूप चांगला ठरला आहे, गेल्या वर्षभरात गुंवतणूकदारांनी तब्बल 64 लाख कोटी रुपयांची कमाई केल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतंय. 


संवत 2079 गुंतवणूकदारांसाठी शुभ


संवतच्या संदर्भात बोलायचे झाले तर आज शेअर बाजारातील जुने वर्ष संपले असून नवीन वर्ष सुरू होणार आहे. त्या निमित्ताने संध्याकाळी एक तासाचा विशेष मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. जर मागील एक वर्ष म्हणजे संवत 2079 बद्दल बोलायचं झालं तर ते शेअर बाजारासाठी शुभ सिद्ध झाले आहे. या कालावधीत निफ्टी 50 सुमारे 10 टक्क्यांनी वाढला आहे. संवत 2079 मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी या दोघांनीही नवा ऐतिहासिक उच्चांक नोंदवला आहे.


शेअर बाजारातील सर्वात मोठा बदल


गेल्या दिवाळीपासून या दिवाळीपर्यंतच्या आकड्यांवर नजर टाकली तर बाजारातील गुंतवणूकदारांनीही या काळात मोठी कमाई केली आहे. वादग्रस्त हिंडेनबर्ग अहवाल, भू-राजकीय तणाव, कच्चे तेल आणि डॉलरची वाढ, विक्रमी महागाई आणि परकीय गुंतवणूकदारांची अधूनमधून विक्री यासारख्या आव्हानांवर मात करत गेल्या वर्षभरात बाजारात अनेक बदल झाले आहेत. सर्वात मोठा बदल म्हणजे DII म्हणजे देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी FPI वर मात केली.


221 शेअर्स मल्टीबॅगर झाले


गेल्या संवत आणि या संवत दरम्यान शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 64 लाख कोटी रुपयांची मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. गुंतवणूकदारांच्या कमाईच्या या कालावधीत सर्वात मोठा वाटा गेल्या दिवाळीपासून मल्टीबॅगर्स झालेल्या शेअर्सचा आहे. बाजारातील आकडेवारीनुसार, विक्रम संवतानुसार, गेल्या वर्षभरात बाजारात 221 शेअर्स मल्टीबॅगर्स झाले आहेत.


मल्टीबॅगर शेअर्स म्हणजे काय? 


मल्टीबॅगर्स हे असे शेअर्स आहेत जे त्यांच्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीच्या निश्चित कालावधीत दुप्पट करतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर ज्या शेअर्सच्या किमती निर्धारित कालावधीत किमान 100 टक्क्यांनी वाढतात त्यांना त्या कालावधीचे मल्टीबॅगर शेअर्स म्हणतात. गेल्या दिवाळीपासून या दिवाळीपर्यंत बाजारातील 221 समभागांनी त्यांच्या गुंतवणूकदारांचे पैसे किमान दुप्पट केले आहेत.


मल्टीबॅगर परतावा देण्यात लहान शेअर्स पुढे


संवत 2079 हे विशेषत: लहान आणि मध्यम समभागांसाठी चांगले सिद्ध झाले आहे. या कालावधीत, मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकांनी ब्लू चिप कंपन्यांना म्हणजेच लार्ज कॅप समभागांना मोठ्या फरकाने मागे टाकले आहे. ब्लू चिप शेअर्सचा निर्देशांक सुमारे 10 टक्क्यांनी वाढला आहे, तर मिड आणि स्मॉल कॅपचा निर्देशांक 30 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. यामुळेच मल्टीबॅगर बनणाऱ्या समभागांमध्ये सर्वात मोठा वाटा हा छोट्या समभागांचा आहे. आकडेवारी असं सांगते की गेल्या दिवाळीपासून आतापर्यंत अशा 172 कंपन्यांच्या समभागांनी मल्टीबॅगर परतावा दिला आहे, ज्यांची मार्केट कॅपनुसार स्मॉल कॅप श्रेणीमध्ये गणना केली जाते.


ही बातमी वाचा: