World Gold Rate : सध्या सोन्याच्या दरात (Gold Price) वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, ही वाढ कायम राहणार की दरात घसरण होणार? असा प्रश्न सर्वांनाचं पडला असेल. तर पुढच्या काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. कारण जगभरातील 81 टक्के केंद्रीय बँका (Central Banks) पुढील 12 महिन्यांत आणखी सोन्याची खरेदी करणार आहेत. जागतिक सुवर्ण परिषदेनं याबाबतचा अहवाल दिला आहे.


जगभरातील तणाव आणि आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्याच्या मागणीत वाढ


भारतातील बँकिंग क्षेत्राचे नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासह जगभरातील केंद्रीय बँकांनी 2023 मध्ये 1037 टन सोन्याची खरेदी केली होती. जी 2022 मध्ये खरेदी केलेल्या 1082 टनानंतरची दुसरी सर्वात मोठी खरेदी आहे. जगभरातील तणाव आणि आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्याच्या मागणीत ही वाढ दिसून येत आहे. त्यामुळं मोठ्या बँका सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने आपल्या अहवालात म्हटले आहे की, सोन्याची ही विक्रमी खरेदी हे सूचित करते की केंद्रीय बँकांसाठी सोने ही सर्वोत्तम राखीव मालमत्ता आहे. पुढील 12 महिन्यांत या केंद्रीय बँका अधिक सोने खरेदी करतील, ज्यामुळे सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


पुढील 12 महिन्यांत बँका अधिक सोन्याची खरेदी करुन साठा वाढवणार 


दरम्यान, सर्वेक्षणात 70 केंद्रीय बँकांचे प्रतिसाद प्राप्त झाले आहेत, ज्यामध्ये 29 टक्के मध्यवर्ती बँकांनी पुढील 12 महिन्यांत अधिक सोने खरेदी करून सोन्याचा साठा वाढवणार असल्याचे सांगितले. 2018 मध्ये सुरू झालेल्या या सर्वेक्षणानंतरची ही दुसरी उच्च पातळी आहे, जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात केंद्रीय बँका सोन्याचा साठा वाढविण्याबाबत बोलत आहेत. केंद्रीय बँकांकडून सोन्याच्या नियोजित खरेदीची कारणे पाहिल्यास, देशांतर्गत सोन्याचे उत्पादन, उच्च जोखीम आणि वाढती महागाई याविषयी वित्तीय बाजारांची चिंता लक्षात घेऊन केंद्रीय बँका धोरणात्मकरीत्या त्यांचे सोने होल्डिंग वाढवत आहेत.


सोने खरेदीत RBI चा जगातील पहिल्या पाच मध्यवर्ती बँकांमध्ये समावेश 


सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 69 मध्यवर्ती बँकांपैकी 81 टक्के बँकांनी सांगिलतले की, सोन्याच्या साठ्यात वाढ होईल, तर 19 टक्के बँकांनी त्यात कोणताही बदल होणार नसल्याचे सांगितले. 71 टक्के केंद्रीय बँकांनी 2023 मध्ये सोन्याचा साठा वाढविण्याबाबत बोलले होते. तर 69 टक्के केंद्रीय बँकांनी सांगितले की, एकूण परकीय चलनाच्या साठ्यात सोन्याचा वाटा पुढील पाच वर्षांत वाढेल. सोने खरेदीच्या बाबतीत, RBI चा जगातील पहिल्या पाच मध्यवर्ती बँकांमध्ये समावेश आहे.


महत्वाच्या बातम्या:


धक्कादायक! 300 रुपयांचे दागिने तब्बल 6 कोटींना, अमेरीकेच्या महिलेची फसवणूक, पिता-पुत्र फरार