Demat Account: बाजार नियामक सेबीनं (SEBI) वैयक्तिक डिमॅट अकाउंट होल्डर्सना (Demat Account Holder) आणि म्युच्युअल फंड (Mutual Fund) गुंतवणूकदारांसाठी नॉमिनी नोंदणी करण्याची, तसेच ही प्रोसेस पूर्ण करण्याची मुदत 30 सप्टेंबर रोजी संपत आहे. SEBI नं म्हटलं आहे की, जर दिलेल्या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर अकाउंट फ्रीज केलं जाईल. बाजार नियामक सेबीनं डिमॅट अकाउंट होल्डर्सना सप्टेंबरच्या अखेरीस नॉमिनी निवडण्याचा किंवा या प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय दिला होता. दरम्यान, यापूर्वी सेबीनं 31 मार्च 2023 पर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली.
'हे' काम 30 सप्टेंबरपर्यंत करा, अन्यथा तुमचं डिमॅट खातं फ्रीज केलं जाईल
SEBI च्या निर्देशांनुसार, सर्व वैयक्तिक डिमॅट खातेधारक आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांना 30 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या नॉमिनीची नोंदणी करण्यासाठी किंवा घोषणापत्र भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. असं न केल्यास, गुंतवणुकदारांची डिमॅट खाती आणि फोलिओ फ्रीज केले जातील, म्हणजेच तुमचं डिमॅट खातं गोठवलं जाईल आणि डिमॅट अकाउंट होल्डर त्यांच्या खात्यातून व्यवहार किंवा ट्रेडिंग करु शकणार नाहीत. नव्या आणि जुन्या दोन्ही गुंतवणुकदारांना हा नियम लागू असून सर्वांनाच नॉमिनीची नोंदणी करणं अनिर्वाय असणार आहे. हे पाऊल गुंतवणूकदारांना त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांची गुंतवणूक त्यांच्या कायदेशीर वारसांना सुपूर्द करण्यात मदत करण्यासाठी उचलण्यात आलं आहे.
नॉमिनी म्हणजे काय?
नॉमिनी म्हणजे ज्या व्यक्तीचे नाव बँक खातं, गुंतवणूक किंवा विम्यामध्ये आहे आणि संबंधित व्यक्तीचं अचानक निधन झाल्यास गुंतवणुकीची रक्कम मिळण्यास पात्र असलेल्या व्यक्तीला नॉमिनी असं म्हणतात. यापूर्वी सेबीनं डिमॅट खातेधारकांना 31 मार्च 2022 पर्यंत नामांकनाबाबत माहिती देण्यास सांगितलं होतं. मार्केट रेग्युलेटर सेबीनं म्युच्युअल फंड युनिट धारकांसाठी नामांकन सबमिट करण्याचा किंवा सबमिट न करण्याचा पर्याय 31 मार्च ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवला होता. आतापर्यंत सेबीनं नामांकनाची मुदत तीन वेळा वाढवली आहे.
देशातील डिमॅट अकाउंट्सची संख्या 12.7 कोटींवर
देशातील डिमॅट खात्यांची संख्या आता 12.7 कोटींवर पोहोचली आहे. ऑगस्टमध्ये डिमॅट खाती 26 टक्क्यांनी वाढून 12.7 कोटींवर पोहोचली आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील डिमॅट खात्यांची संख्या 12.3 कोटी होती. आता नव्यान समोर आलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2023 अखेरपर्यंत NSDL आणि CDSL या दोन डिपॉझिटरीजमध्ये एकूण 12.7 कोटी डिमॅट खाती नोंदणीकृत होती, तर साधारणतः एका वर्षापूर्वी ही संख्या 10.1 कोटी होती.
जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये 4 टक्क्यांनी वाढली डिमॅट अकाउंट्सची संख्या
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या विश्लेषणानुसार, नव्या खात्यांची संख्या मासिक आधारावर 4.1 टक्क्यांनी वाढून ऑगस्टमध्ये 31 लाख झाली आहे, जी जुलैमध्ये 30 लाख होती.
SEBI कडे कोणता डेटा आहे?
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या आकडेवारीनुसार, ऑगस्टच्या अखेरपर्यंत एकूण 12.7 कोटींपैकी 3.3 कोटी आणि 9.35 कोटी डिमॅट खाती अनुक्रमे NSDL आणि CDSL मध्ये नोंदणीकृत होती.
देशात डिमॅट खाती उघडणाऱ्यांच्या संख्येत का होतेय वाढ?
शेअर मार्केटमधून मिळणारा बक्कळ परतावा, हे यामागील मुख्य कारण असल्याचं अर्थ विश्लेषकांकडून सांगितलं जात आहे. तसेच, डिमॅड खातं उघडण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सहज आहे. त्यामुळेच अगदी सर्वसामान्यही डिमॅट खातं उघडण्यास इच्छुक असल्याचं पाहायला मिळतं. दरम्यान, डिमॅट खात्यांची संख्या वार्षिक आधारावर 26 टक्क्यांनी वाढून ऑगस्ट 2023 मध्ये 12.7 कोटी इतकी झाली आहे.