Gold Mines in India : देशातच आता मोठ्या प्रमाणात सोन्याचे उत्पादन होणार आहे. लवकरच डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड (Deccan Gold Mines Ltd.) या खासगी खाणीत लवकरच सोन्याचं उत्पादन सुरू होणार आहे. देशातील (India) पहिली मोठी खाजगी सोन्याची खाण  (First Private Gold Mine) पुढील वर्षाच्या अखेरीस सुरू होईल आणि यातून मोठ्या प्रमाणात सोन्याचं उत्पादन होईल, अशी माहिती डीजीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालकांनी (DGML MD) दिली आहे. डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड आंध्र प्रदेशातील सोन्याच्या खाणींवर वेगाने काम करत आहे. कंपनीला लवकरच पूर्ण उत्पादन सुरू करणार आहे.


देशातील पहिली मोठी खाजगी सोन्याची खाण


भारतात गुंतवणुकीसाठी सोने हा अतिशय चांगला पर्याय मानला जातो. देशात सोन्याच्या अनेक खाणी आहेत. देशातील पहिली मोठी खासगी सोन्याची खाण पुढील वर्षी सुरू होणार आहे. ही खाण डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड कंपनीची असेल. पुढील वर्षापासून या सोन्याच्या खाणीमध्ये पूर्ण उत्पादन सुरू करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.


पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण उत्पादन


डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हनुमा प्रसाद यांनी सांगितलं की, आंध्र प्रदेशात देशातील पहिल्या मोठ्या सोन्याच्या खाणीमध्ये पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण उत्पादन सुरु करण्यात येईल. जोन्नागिरी गोल्ड प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये पायलट स्केल ऑपरेशन आधीच सुरू झालं आहे. पायलट स्केल ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर या खाणीतून वर्षाला सुमारे 750 किलो सोने तयार होऊ शकते. 


दरवर्षी सुमारे 750 किलो सोन्याचं उत्पादन


हनुमा प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुासार, जोन्नागिरी गोल्ड प्रोजेक्टमध्ये पूर्ण प्रमाणात उत्पादन सुरू झालं की, दरवर्षी सुमारे 750 किलो सोन्याचं उत्पादन होईल. आतापर्यंत या खाणीत सुमारे 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. सध्या या खाणीत दरमहा सुमारे एक किलो सोने तयार केलं जात आहे. खाणीतील बांधकामाचे काम वेगाने सुरू आहे आणि पुढील वर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यापर्यंत या खाणीत पूर्ण क्षमतेने सोन्याचं उत्पादन सुरू होईल, अशी आशा हनुमा प्रसाद यांनी व्यक्त केली आहे.


देशातील पहिली आणि एकमेव सूचीबद्ध कंपनी


डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड कंपनीच्या खाजगी सोन्याच्या खाणी आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील तुग्गली मंडलममध्ये आणि जोन्ननागिरी, एरागुडी आणि पगादिराई या गावांच्या आसपास आहेत. या खाणीला 2013 साली मान्यता मिळाली होती. या भागात सोनं शोधण्यासाठी कंपनीला सुमारे 8-10 वर्षे लागली. जोन्नागिरी गोल्ड माईन्स जिओमिसोर सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड विकसित करत आहे, यामध्ये डेक्कन गोल्ड माईन्सचा सुमारे 40 टक्के हिस्सा आहे. डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड ही देशातील पहिली आणि आतापर्यंतची एकमेव सोने शोधक कंपनी आहे, जी BSE वर सूचीबद्ध आहे.


भारतात सोन्याचं उत्पादन कुठे होतं?


भारतात सोन्याचे सर्वात मोठे उत्पादन कर्नाटक राज्यात होतं. कर्नाटक राज्यात कोलार, हुट्टी आणि उटी येथील सोन्याच्या खाणीतून सर्वाधिक सोनं उत्पादन होतं. त्यासोबतच आंध्र प्रदेश आणि झारखंडच्या काही भागांतही सोन्याच्या खाणी आहेत.