CNG-PNG Price Hike Possibility : देशातील महागाईत (Recession) सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा भार पडत असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खाद्यपदार्थ, कच्चे तेल, फळे, भाजीपाला यासह अनेक उत्पादनांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. महागाईमुळे सर्वसामान्यांचे हाल होत असल्यामुळे घरखर्च भागवणं कठीण होत आहे. अशावेळी, आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना आणखी फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच देशात उत्पादित नैसर्गिक वायूच्या किमतीवर मर्यादा घालण्याचा विचार करत आहे. सीएनजीपासून खत कंपन्यांपर्यंतचा उत्पादन खर्च कमी करणे हा यामागचा उद्देश आहे. 


सीएनजी-पीएनजीचे दर वाढणार?


1 एप्रिल 2023 पासून देशात नैसर्गिक वायूच्या किंमती वाढण्याची शक्यता आहेत. याचा फटका देशातील सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच देशात उत्पादित नैसर्गिक वायूच्या किमती वाढविण्याचा विचारात आहे. सरकार 1 एप्रिल रोजी या संदर्भात निर्णय जारी करण्याची शक्यता आहे. नैसर्गिक वायूचे दर वाढल्याने सीएनजी-पीएनजीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांच्या वाहतुकीवरही परिणाम होणार आहे. यामुळे ऑटो रिक्षा, टेम्पोचे भाडे वाढण्याची शक्यता आहे.


1 एप्रिलपासून नवे नियम लागू होण्याची शक्यता


देशात नैसर्गिक वायूची किंमत वर्षातून दोनदा निश्चित केली जाते. गेल्या वेळी नैसर्गिक वायूच्या किंमतीत तब्बल 40 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. एप्रिलपासून पुन्हा एकदा नैसर्गिक वायूच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार वर्षातून दोन वेळा स्थानिक पातळीवर उत्पादित नैसर्गिक वायूच्या किंमती ठरवते. या नैसर्गिक वायूचं रूपांतर CNG आणि स्वयंपाकासाठी पाईप गॅस (PNG) मध्ये केलं जातं. याशिवाय नैसर्गिक वायूचा वापर वीज आणि खत निर्मितीमध्येही होतो. आता हे दर 1 एप्रिल रोजी सुधारित केले जाणार आहेत. त्यामुळे दर वाढल्यास सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.


जागतिक बाजारात ऊर्जेच्या किमतीत वाढ


रशियाच्या युक्रेनवर आक्रमणानंतर जागतिक बाजारात ऊर्जेच्या किमतीत वाढ झाली आहे. यामुळे स्थानिक पातळीवर उत्पादित वायूचे दरही विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. 


सीएनजी-पीएनजीच्या किमती 70 टक्क्यांपर्यंत वाढ


नैसर्गिक वायूच्या किमतीत शेवटच्या वेळी बदल झाल्यानंतर सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत 70 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. 1 एप्रिलपासून दर सुधारित केल्यास यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या संदर्भात सरकारने गेल्या वर्षी किरीट पारीख यांच्या अध्यक्षतेखाली गॅसच्या किंमतीत सुधारण्यासाठी एक समितीही स्थापन केली होती.