मुंबई: उद्या जाहीर होणाऱ्या आरबीआयच्या पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली. शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली, पण नंतर गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. दिवसाच्या शेवटी मात्र बाजार काहीसा सावरल्याचं चित्र आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 51 अंकांची घसरण झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये केवळ 6 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 0.09 टक्क्यांची घसरण होऊन तो 58,298 वर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.04 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,382 अंकांवर पोहोचला. 


आज शेअर बाजार बंद होताना 1515 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1735 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली, तसेच 141 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. Cipla, Sun Pharma, Nestle India, Infosys आणि Apollo Hospitals या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर NTPC, Tata Consumer Products, Coal India, SBI आणि Reliance Industries या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली. 


मेटल, आयटी आणि आरोग्य क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली तर रिअॅलिटी क्षेत्रामध्ये एका टक्क्यांची घसरण झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये काहीशी वाढ झाली. 


रुपया आजही घसरला
डॉलरच्या तुलनेत आजही रुपयाच्या किमतीमध्ये 31 पैशांची घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 79.47 इतकी आहे. 


शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक
आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 200 हून अधिक अंकांनी वधारत 58,571.28 अंकांवर खुला झाला. एनएसईचा निफ्टी निर्देशांक 74.95 अंकांनी वधारत  17,463.10 वर खुला झाला.  सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 276 अंकांनी वधारत 58,627.21 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 78  अंकानी वधारत 17,466.45 अंकावर व्यवहार करत होता. 


या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली



  • Cipla- 3.23 टक्के

  • Nestle- 2.50 टक्के

  • Sun Pharma- 2.40 टक्के

  • Infosys- 2.16 टक्के

  • Apollo Hospital- 1.99 टक्के


या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली



  • NTPC- 3.10 टक्के

  • TATA Cons. Prod- 2.89 टक्के

  • Coal India- 2.33 टक्के

  • SBI- 1.41 टक्के

  • Reliance- 1.32 टक्के