मुंबई: शेअर बाजारातील घसरणीचे सत्र आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही सुरूच राहिलं आहे. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 135 अंकांची घसरण झाली आहे तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 67 अंकांची घसरण झाली आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 0.26 टक्क्यांची घसरण होऊन तो 51,360 वर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.44 टक्क्यांची घसरण होऊन तो 15,293 वर स्थिरावला.
आज शेअर बाजार बंद होताना 1082 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 2162 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. तसेच 95 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
आशियातील प्रमुख शेअर बाजारांत या आठवड्यात घसरण
आशियातील सर्व प्रमुख शेअर बाजारामध्ये या आठवड्यात 2.1 टक्के तर 6.7 टक्क्यांची घसरण झाल्याचं ब्लूमबर्गने त्यांच्या अहवालात सांगितलं आहे. जकार्ता शेअर बाजारात 2.1 टक्क्यांची घसरण झाली आहे तर हँग सेंगमध्ये 3.4 टक्के, तैवान शेअर बाजारात 5 टक्के तर निक्केई शेअर बाजारात 6.7 टक्क्क्यांची घसरण झाली आहे.
अमेरिकेतली मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने त्याच्या व्याजदरात वाढ केल्याने त्याचा परिणाम जगभरासह भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आलं.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
- Bajaj Finance- 2.57 टक्के
- Bajaj Finserv- 2.47 टक्के
- JSW Steel- 1.60 टक्के
- Coal India- 1.53 टक्के
- ICICI Bank- 1.23 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली
- Titan Company- 6.04 टक्के
- Wipro- 4.05 टक्के
- Shree Cements- 3.56 टक्के
- HDFC Life- 3.46 टक्के
- BPCL- 3.42 टक्के
अमेरिकेत फेडने व्याजदर वाढवले
अमेरिकेतील महागाईने गेल्या 40 वर्षातील महागाई दराचा तळ गाठला आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने म्हणजे फेडरल बँकेने व्याजदरात 0.75 टक्क्यांची वाढ केली आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला असून शेअर बाजार चांगलाच कोसळला.
परकीय गुंतवणुकदारांकडून गुंतवणूक मागे
परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारातही घसरण होत आहे. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. परकीय गुंतवणूकदारांकडून गेल्या काही दिवसांमध्ये 31,000 कोटी रुपये काढून घेण्यात आले आहेत. गेल्या पाच महिन्यामध्ये 2.2 लाख कोटी रुपये काढून घेण्यात आले आहेत.