मुंबई: शेअर बाजारातील आठवड्याची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली असून गुंतवणूकदारांना मोठं नुकसान सहन करावं लागलंय. शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात घसरण झाली असून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 872 अंकांची घसरण झाली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 267 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 1.46 टक्क्यांची घसरण झाली असून तो 58,773 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 1.51 टक्क्यांची घसरण झाली असून तो 17,490 अंकांवर पोहोचला. बँक निफ्टीमध्येही 688 अंकांची घसरण झाली असून तो 38,297 अंकांवर पोहोचला.
आज शेअर बाजारामध्ये 1228 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 2214 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. आज 163 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. गेल्या दोन सत्रातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं मात्र 6.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं दिसून येतंय.
सर्वच क्षेत्रात घसरण
आज शेअर बाजार बंद होताना Tata Steel, Asian Paints, Adani Ports, Tata Motors आणि JSW Steel कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर ITC, Coal India, Tata Consumer Products, Nestle India आणि Britannia Industries या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. आज सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये एक टक्क्यांची घसरण झाली.
रुपयाची घसरण
डॉलरच्या तुलनेत आज रुपयाच्या किमतीत 9 पैशांची घसरण झाली असून रुपयाची आजची किंमत 79.87 इतकी आहे.
शेअर बाजारात आज विक्रीचा दबाव
आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. बीएसईचा 30 स्टॉक्सचा निर्देशांक सेन्सेक्स 285.07 अंकांच्या घसरणीसह 59,361 अंकांवर खुला झाला होता. तर, एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 75.55 अंकांच्या घसरणीसह 17,682 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 516 अंकांची घसरण होऊन 59,126.20 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टीत 155 अंकांची घसरण दिसत असून 17,603.10 अंकांवर व्यवहार सुरू होता.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
- TATA Cons. Prod- 0.89 टक्के
- ITC- 0.77 टक्के
- Coal India- 0.53 टक्के
- Britannia- 0.38 टक्के
- Nestle- 0.06 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली
- Tata Steel- 4.54 टक्के
- Asian Paints- 3.81 टक्के
- Adani Ports- 3.62 टक्के
- Tata Motors- 3.48 टक्के
- JSW Steel- 3.25 टक्के