मुंबई : भारतीय शेअर बाजारात (Share Market Closing Bell) आज मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीला लगाम लागला. गुंतवणूकदारांनी केलेल्या नफा वसुलीने बाजारात घसरण दिसून आली. मिड कॅप (Mid Cap) आणि स्मॉल कॅप (Small Cap) स्टॉक्समध्ये चौफेर विक्रीचा जोर दिसला. मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्समध्ये झालेल्या घसरणीमुळे बाजारावर मोठा दबाव दिसून आला. निफ्टी मिड कॅप इंडेक्समध्ये 1300 अंकांनी म्हणजे जवळपास  3..13 टक्क्यांची घसरण दिसून आली. स्मॉल कॅप इंडेक्समध्ये 528  अंकांची म्हणजेच 4.07 टक्क्यांची घसरण दिसून आली. स्मॉल कॅप इंडेक्स 12,453 अंकांवर स्थिरावला. 

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 94.05 अंकांच्या तेजीसह 67,221 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 3.15 अंकांच्या घसरणीसह 19,993 अंकांवर बंद झाला. 

आज दिवसभरातील व्यवहारात कोचिन शिपयार्डमध्ये 11.49 टक्क्यांची घसरण दिसून आली. तर, बीईएमएलमध्ये 11.23 टक्के, आलोक इंडस्ट्रीजमध्ये 11.17 टक्के, रेल विकास निगममध्ये 10.37 टक्के, राइट्समध्ये 9.52 टक्के, एनबीसीसीमध्ये 9.21 टक्के, इंजिनियर्स इंडियामध्ये 9.01 टक्क्यांची घसरण दिसून आली. तर, टीसीएसमध्ये 2.88 टक्के, लार्सनमध्ये 1.72 टक्के, इन्फोसिसमध्ये 1.67 टक्क्यांची तेजी दिसून आली. 

कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार?

मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शिवाय ऑटो, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, ग्राहकोपयोगी वस्तू , ऑईल अॅण्ड गॅस, हेल्थकेअर, बँकिंग सेक्टरमधील शेअर्समध्ये घसरण दिसून आली. आयटी आणि फार्मा सेक्टरमधील शेअर्स दरात वाढ झाली. निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 19 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी 15 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली.

मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी बहुतांशी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,805 कंपन्यांच्या शेअर दराचे व्यवहार झाले. त्यापैकी 692 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. तर, 2,995 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. तर 118 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. त्याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 263 समभागांनी त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 20 कंपन्यांच्या शेअर दराने त्यांचा 52 आठवड्यांचा नीचांक गाठला. 

इंडेक्‍स किती अंकांवर बंद दिवसभरातील उच्चांकदिवसभरातील नीचांककिती टक्के बदल
BSE Sensex67,221.1367,539.1066,948.1800:02:01
BSE SmallCap36,982.7438,769.3336,931.57-4.02%
India VIX11.6912.0210.713.02%
NIFTY Midcap 10040,170.3041,686.7540,128.00-3.07%
NIFTY Smallcap 10012,450.2013,079.2012,414.20-4.10%
NIfty smallcap 505,739.256,047.555,721.70-4.27%
Nifty 10019,905.2020,082.4019,835.05-0.33%
Nifty 20010,645.0510,785.6010,618.55-0.75%
Nifty 5019,993.2020,110.3519,914.65-0.02%

गुंतवणूकदारांना मोठा फटका 

मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 12 सप्टेंबर रोजी 318.73 लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले. हे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवार, 11 सप्टेंबर रोजी 324.26 लाख कोटी रुपये होते. आजच्या घसरणीमुळे  मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 5.53 लाख कोटी रुपयांनी घसरले.