नवी मुंबई : शहर व औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोकडून माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेची जोरदार प्रसिद्धी केली होती. सिडकोकडून या योजनेद्वारे 26 हजार घरांची विक्री केली जाणार आहे. नवी मुंबईत नागरिकांना परवडणारी घरं उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशानं नोंदणी करण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ दिली होती.मात्र, सिडकोला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नसल्याचं चित्र आहे. 26 हजार घरांसाठी 55 हजार अर्ज आले आहेत. या संदर्भातील वृत्त एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झालं आहे. 


सिडकोनं माझे पसंतीचे घर योजनेला तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली होती. ही मुदत काल म्हणजेच 10 जानेवारीला संपली. या योजनेत तळोजा, खारगर, पनवेल, कळंबोली, वाशीमधील घरांची विक्री केली जाणार आहे. 


सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार माझे पसंतीचे सिडकोचे घर यासाठी  जवळपास 136000 जणांनी अर्ज  केले होते. मात्र, 55 हजार अर्जदारांनी नोंदणी शुल्क जमा केलं. त्यामुळं साधारणपणे एका घरासाठी 2 अर्ज आले आहेत. या घरांसाठी नोंदणी करणाऱ्यांनी सिडकोनं किमती जाहीर करताच नाराजी व्यक्त केली होती. खासगी विकासकांकडून विक्री केल्या जाणाऱ्या घरांच्या किमती इतक्याच किमती या योजनेतील घरांच्या आहेत, असा दावा अर्जदारांकडून केला जात आहे. 


आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील घरांची किंमत 25 लाख ते 48 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. तर, लोअर इनकम ग्रुपमधील घरांची किंमत 34 लाख ते 97 लाख रुपये आहे. 


सिडकोच्या 26 हजार घरांपैकी 10518 घरं तळोजा भागात आहेत. त्या भागात कथित प्रदूषण आणि पाण्याची समस्या असल्याचं काही अर्जदारांकडून सांगण्यात आलं. याशिवाय 74 लाखांच्या घराच्या खरेदीसाठी 5 लाख रुपयांच्या नोंदणी फी आणि स्टॅम्प ड्यूटी लागू शकते, असंही काही जणांनी म्हटलं. 


सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेसाठी कमी अर्ज आल्यासंदर्भात दखल घेतली आहे. सिडकोनं अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुढच्या लॉटरीत प्रयत्न करावेत, असं संजय शिरसाट म्हणाले. मात्र, त्यांनी यावेळी सिडकोनं निश्चित केलेल्या घरांचं समर्थन केलं आहे.


संजय शिरसाट यांनी सिडकोच्या प्रशासकीय अकार्यक्षमेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सिडकोकडून निर्णयप्रक्रियेत उशीर होत असल्याचा देखील त्यांनी उल्लेख केला. माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला आहे. 


दरम्यान, सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेसाठी ज्यांनी अर्ज केले होते त्यांना आजपासून पंसतीक्रम नोंदवता येतील. पसंतीक्रम नोंदवल्यानंतर बुकिंग शुल्क भरावं लागेल.


इतर बातम्या :


Cidco Homes : सिडकोच्या 26000 घरांसाठी पसंतीक्रम कधीपासून नोंदवायचा? बुकिंग शुल्क कधी भरायचं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया