मुंबई : सध्याच्या काळात घर खरेदी करायचं असेल किंवा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करायचा असेल, चारचाकी वाहन खरेदी करायचं असेल तर बँकांकडून कर्ज काढावं लागतं. अनेकदा चांगला पगार असून देखील बँका कर्ज द्यायला नकार देतात. याचं प्रमुख कारण संबंधित व्यक्तीचा सिबिल स्कोअर चांगला नसणं हे असतं. सिबिल स्कोअर खराब असल्यास कर्ज मिळणं अवघड होतं. जेव्हा सिबिल स्कोअर चांगला असतो तेव्हा बँकांकडून लगेचच कर्ज दिलं जातं.

कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोअर किती असावा?

तुम्हाला कर्ज घ्यायचं असल्यास तुम्ही प्रथम सिबिल स्कोअर तपासून घ्या. सिबिल स्कोअरद्वारे कर्ज परतफेड करण्याची क्षमता, कर्ज परतफेड करताना दिरंगाई केली असल्यास त्याची माहिती बँकांना मिळते. सिबिल स्कोअर जितका चांगला असतो, त्याचा कर्जदाराला फायदा होतो.कोणत्याही व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर 300 ते 900 दरम्यान असतो. ज्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर 700 पेक्षा अधिक असतो त्यांना कर्ज देताना बँका नकार देत नाहीत. त्यापेक्षा स्कोअर कमी असल्यास बँका कर्ज देत नाहीत.

सिबिल स्कोअर कसा वाढवायचा?

सिबिल स्कोअर 700 च्या वर न्यायचा असेल तर काही टिप्स द्वारे तो सुधारता येई शकतो. सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी सध्या सुरु असलेल्या कर्जाच्या ईएमआयची वेळेवर परतफेड करा. जर कोणतंही कर्ज सुरु नसेल तर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरुन खरेदी करुन ईएमआयचा पर्याय निवडा. तिथं तुम्ही बाय नॉऊ पे लॅटर पर्यायाचा वापर करु शकता. यामुळं तुमचा सिबिल स्कोअर टप्प्या टप्प्यानं वाढू शकतो. पेट्रोल भरण्यासाठी पेट्रो कार्डचा वापर करुन त्याचं पेमेंट योग्य वेळी केल्यास त्याचा ही फायदा होऊ शकतो. मोबाईलचं सीम कार्ड पोस्टपेड करुन त्याचं योग्य वेळी पेमेंट करा, या मार्गांचा वापर केल्यास सिबिल स्कोअर सुधारु शकतो.

सिबिल स्कोअर खराब होऊ नये म्हणून काय करावं?

सिबिल स्कोअर खराब होऊ नये यासाठी तुमच्या कर्जाचे ईएमआय योग्य वेळी भरणं आवश्यक आहे. ईएमआय भरताना त्यामध्ये उशीर होऊ देऊ नका. क्रेडिट कार्डचा वापर करताना योग्यप्रकारे करा. क्रेडिट कार्ड देताना बँका विविध ऑफर्स देतात. क्रेडिट कार्डचा योग्य वापरकेल्यास सिबिल स्कोअर खराब होऊ शकतो. जर, तुमच्यावर कोणतंही कर्ज असेल आणि तुम्हाला नवं कर्ज हवं असेल तर त्यापूर्वी जुन्या कर्जाची परतफेड करावी. कर्ज घेताना देखील तुमची जितकी परतफेडीची क्षमता असेल तितकंच ते घ्यावं.