मुंबई : रिलायन्स आणि स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातील साधारण 71 हजार कोटी रुपयांच्या एका कराराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारच्या महिती आणि प्रसारण मंत्रालयाने या कराराला मंजुरी दिली आहे. या कराराअंर्गत रिलायन्स इन्डस्ट्रिज लिमिटेड या कंपनीच्या वायकॉम 18 या उपकंपनीच्या मालकीचे नॉन न्यूज आणि करन्ट अफेअर्सशी संबंधित असलेल्या चॅनेल्सचा परवाना स्टार इंडिया या कंपनीत हस्तांतरीत केला जाईल. म्हणजेच वायकॉम 18 प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे असलेली चॅनेल्स हे स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरीत केली जातील. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाच्या (CCI) अटी शर्तींच्या अधीन राहून ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे.
CCI कोणत्या गोष्टींची काळजी घेणार?
विलीनीकरणाच्या या प्रक्रियेवर भारतीय प्रतिस्पर्धी आयोगाची करडी नजर असणार आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर या क्षेत्रात असलेल्या अन्य प्रतिस्पर्ध्यांवर कोणताही प्रतिकूल परिणाम पडणार नाही, अन्य स्पर्धकांचे अधिकार सुरक्षित राहतील याची सीसीआय काळजी घेणार आहे. या विलीनीकरणामुळे माध्यम क्षेत्रात एकाधिकाराची स्थिती निर्माण होणार नाही. तसेच सर्व चॅनेल्सच्या प्रेक्षकांना उच्च गुणवत्तेची सेवा मिळत राहील, याचीही काळजी CCI कडून घेतली जाईल.
माध्यम क्षेत्रात काय बदल होणार?
वायकॉम 18 प्रायव्हेट लिमिटेड आणि स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात होत असलेल्या करारामुळे माध्यम क्षेत्रात मोठा बदल होणार आहे. या कराराचा परिणाम दोन्ही ब्रँडशी संबंधित असलेल्या चॅनेल्सच्या लोकप्रियतेवर पडणार आहे. सोबतच या करारामुळे प्रतिस्पर्धा आणि नाविन्यतेलाही चालना मिळण्याची आशा आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचा जिओ आणि वायकॉम 18 या ब्रँड्सच्या माध्यमातून माध्यम क्षेत्रात दबदबा राहिलेला आहे. त्यानंतर आता रिलायन्सचा स्टार इंडियासोबत हा करार पूर्णत्त्वास येईल. त्यामुळे या दोन्ही ब्रँड्सचा प्रभाव आणखी वाढणार आहे. याआधी सीसीआयने या कराराबाबत चिंता व्यक्त केली होती. याच कारणामुळे या कराराच्या मंजुरीला आणखी वेळ लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
दोन्ही ग्रुपकडे आयपीएल आणि आयसीसी क्रिकेटचे प्रसारण अधिकार
सध्या वॉयकॉम 18 या ब्रँडची मालकी रिलायन्सकडे आहे. जिओ हे ओटीटी माध्यमदेखील रिलायन्सकडून चालवले जाते. तर डिज्नी + हॉटस्टार हे ओटीटी माध्यम स्टार इंडियाच्या मालकीचे आहे. हे दोन्ही ग्रुपकडे आयपीएल आणि आयसीसी क्रिकेटचे प्रसारण अधिकार आहेत. याच कारणामुळे सीसीआयने या कराराबाबत चिंता व्यक्त केली होती.
नव्या ब्रँडकडे 120 टीव्ही चॅनेल्स तसेच 2 ओटीटी प्लॅटफॉर्म्स
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, या कराररानंतर सोनी, झी इंटरटेन्मेंट, नेटफ्लिक्स, अॅमोझॉन आदी ब्रँड्सवर नकारात्मक परिणाम पडेल, अशी चिंता सीसीआयने व्यक्त केली होती. वायकॉम 18 आणि स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या करारानंतर नव्या कंपनीकडे एकूण 120 टीव्ही चॅनेल्स तसेच 2 ओटीटी प्लॅटफॉर्म्स असतील.
हेही वाचा :
फक्त महिनाभर पाहा वाट, 'हे' चार स्टॉक मारणार चौकार; 30 दिवसांत तुम्हाला करणार मालामाल?