DA Hike: केंद्र सरकारने एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि  पेन्शनर्स यांना दसरा-दिवाळीची भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कॅबिनेट बैठकीत महागाई भत्ता वाढवण्याचा (DA Hike) निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ केली. त्यामुळे महागाई भत्ता आता 34 टक्क्यांहून वाढून आता 38 टक्के झाला आहे. 


केंद्र सरकारने लागू केलेली महागाई भत्त्यातील वाढ ही जुलै 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंतच्या काळासाठी असणार आहे. कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना आता 38 टक्के प्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी प्रमाणे असणार आहे. 


सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना 34 टक्क्यांप्रमाणे महागाई भत्ता दिला जातो. मात्र, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने आता महागाई भत्त्यात वाढ करत 38 टक्के केली आहे.  केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या वेतनात वाढीव महागाई भत्ता येणार आहे. मागील तीन महिन्यांच्या महागाई भत्ता मिळणार आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना दसरा-दिवाळीत मोठा दिलासा मिळणार आहे. 


महागाई भत्त्यात वाढ केल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ अपेक्षित आहे. आकडेवारीनुसार, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. 


>> किती वाढणार वेतन?


एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 56 हजार रुपये असल्यास 38 टक्के महागाई भत्ता वाढल्या त्यांना 21, 280 रुपये महागाई भत्ता म्हणून मिळतील. म्हणजे दरमहा 2240 रुपये मिळणार आहेत. वर्षाला 255360 रुपये मिळतील. याचा अर्थ आधीच्या तुलनेत 26,880  रुपये अधिक मिळतील. 


एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18 हजार रुपये असेल तर 34 टक्के दराने त्याला 6120 रुपये मिळतात. मात्र, महागाई भत्ता 38 टक्के केल्यानंतर 6,840 रुपये महागाई भत्ता मिळणार. म्हणजे आधी दरमहा 73,440 महागाई भत्ता मिळत होता. आता, 82,080 रुपये महागाई भत्ता मिळणार आहे.  


केंद्र सरकारकडून किरकोळ महागाईच्या आकडेवारीच्या आधारे जानेवारी आणि जुलै महिन्यात वर्षातून दोनदा DA आणि DR मध्ये सुधारणा करण्यात येते. देशातील महागाई अद्यापही 6 टक्क्यांच्या वर आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरबीआयकडून प्रयत्न सुरू आहेत. सध्या सुरू असलेल्या पतधोरण आढावा बैठकीत आरबीआय व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे.