Cement Price Hike :  घर बांधणी करणे, घरे घेणे महागणार आहे. घर उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या सिमेंटच्या दरात वाढ होणार आहे. सिंमेटच्या दरात दर किलोमागे 15 ते 20 रुपयांची वाढ होणार असल्याचे 'क्रिसील' या पतमानांकन व संशोधन संस्थेने म्हटले आहे. डिझेल आणि कोळशाच्या दरात झालेली दरवाढ यासाठी कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. 


सिमेंटच्या 50 किलोच्या एका गोणीची किंमत 400 रुपयांच्या घरात पोहचण्याची शक्यता असल्याचे क्रिसीलच्या अहवालात म्हटले आहे. मागील काही महिन्यांपासूनच सिमेंटच्या दरात वाढ होत आहे.  येत्या काही महिन्यात सिमेंटच्या दरात  आणखी वाढ होणार आहे. 


आयात करण्यात येणाऱ्या कोळशाच्या दरात (वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये 120 टक्क्यांहून अधिक ) वाढ झाली आहे. वीज आणि इंधन दरातही वाढ झाली आहे. त्याचा परिणाम सिमेंटच्या दरावर होणार आहे. मागील दिवसांमध्ये सिमेंट, पोलाद अन्य संबंधित वस्तूंच्या किंमतीतही वाढ झाली आहे.  


सध्या सिमेंट विक्रीचे प्रमाण कमी असले तरी चालू आर्थिक वर्षात ही विक्री 11-13 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. कोविडचा प्रभाव कमी होत असल्याने पायाभूत सुविधांसह इमारतीच्या बांधकामांचे प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. 


या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सिमेंटच्या मागणीत 20 टक्क्यांहून अधिक मजबूत वाढ दिसून आली. मात्र, दुसऱ्या सहामाहीत ही वाढ 3 ते 5 टक्क्यांवर स्थिर राहण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात गेल्या महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये प्रति बॅग 54 रुपयांची सर्वाधिक वाढ झाली, त्यानंतर मध्य प्रदेशात प्रति बॅग 20 रुपयांची वाढ झाली. उत्तर भारतात मागणीनुसार 12 रुपयांची वाढ झाली, तर पश्चिम भारतातील राज्यांमध्ये प्रति पोती 10 रुपयांनी वाढ झाली.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha