Devendra Fadnavis on Union Budget 2025 : शनिवारी (दि. 01) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अधिवेशनात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आता नोकरदारांना 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कुठलाही कर भरावा लागणार नाही. स्टार्टअपची क्रेडिट लिमिट 10 कोटींवरून 20 कोटींपर्यंत करण्यात आली आहे. तसेच  पंतप्रधान धन धन्य कृषी योजनेची घोषणा करण्यात आली आहे, यामुळे 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अपेक्षापेक्षा अधिक इन्कम टॅक्सची लिमिट थेट सात लाखावरनं बारा लाखापर्यंत नेण्यात आली आहे. त्यामुळे आता बारा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही अशी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आली आहे. याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना, नोकरदारांना, नवतरुणांना या ठिकाणी होणार आहे. यामुळे एक मोठा डिस्पोजेबल इन्कम हे मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे. याचा उपयोग देशाच्या एमएसएमई क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यातून रोजगार निर्मिती देखील होणार आहे.  


हे बजेट भारताच्या आर्थिक इतिहासातला मैलाचा दगड


या अर्थसंकल्पामध्ये अतिशय धीराने घेतलेला हा निर्णय आहे. हा निर्णय भारताच्या आर्थिक इतिहासातला मैलाचा दगड ठरेल. शेती क्षेत्रात शंभर जिल्हे निवडून त्यात शेती विकासाची मोठी योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पहिल्यांदा केंद्र सरकारने तेलबियांच्या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. 100 टक्के खरेदी केंद्र सरकार हमीभावाने करणार आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळण्याकरता मोठा फायदा होणार आहे. मासेमारी करणाऱ्यांकरता देखील तीन लाखांची क्रेडीट लिमिट पाच लाखांपर्यंत करण्यात आली आहे. 




महाराष्ट्र देशाचं स्टार्टअप कॅपिटल


देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हे आता देशाचे स्टार्टअप कॅपिटल झाले आहे. स्टार्टअपमधून सर्वाधिक रोजगाराची निर्मिती होत आहे. त्या स्टार्टअप करता 20 कोटी रुपयांपर्यंत क्रेडिट लिमिट तयार करण्यात आले आहे. याचा नवतरुणांना आणि स्टार्टअपला खूप मोठा फायदा होणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात नवीन इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन तयार करण्यात आली आहे. विशेषतः पीपीपी प्रकल्पांकरता नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे खाजगी क्षेत्राचे गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यातून रोजगाराची निर्मिती होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


आणखी वाचा 


Union Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्प सादर, निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर