Nirmala Sitharaman Budget Speech : नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman)  यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला. यंदाचं वर्ष निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे यंदा केंद्र सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. निवडणुकीपूर्वीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांच्या अनेक मोठ्या घोषणांकडे सर्वांचं लक्ष लागलं होतंच, पण त्यासोबतच अर्थमंत्र्यांच्या भाषणाच्या (Nirmala Sitharaman Budget Speech) वेळेकडेही सर्वांचं लक्ष होतं. यासाठी कारणंही तसंच आहे. आजवरच्या इतिहासात सर्वात मोठं आणि सर्वाधिक वेळ (Longest Budget Speech) अर्थसंकल्प वाचण्याचा विक्रम निर्मला सीतारमण यांच्या नावावर आहे. त्यामुळे आज अर्थमंत्री स्वतःचाच विक्रम मोडणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण, यंदा त्यांनी अवघ्या 60 मिनिटांत पूर्ण केलं. 


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2020 मधील सर्वात प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषण केलं होतं, जे एखाद्या बॉलिवूडपटापेक्षाही मोठं होतं. 2020 मध्ये लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2.42 तासांचं अर्थसंकल्पीय भाषण केलं. मात्र, तेव्हापासून त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाची वेळ कमी होत गेली आणि आजही हा विक्रम कोणालाही मोडता आलेला नाही. निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या अंतरिम बजेट 2024 मधील त्यांचं भाषण 60 मिनिटांत पूर्ण केलं.


गेल्या वर्षी अर्थमंत्र्यांनी किती वेळ केलं भाषण? 


गेल्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला होता. या सर्वसाधारण अर्थसंकल्पीय भाषणाची वेळ 1 तास 25 मिनिटं होती. 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी त्यांना 1 तास 31 मिनिटं लागली. याशिवाय, वर्ष 2019 मध्ये त्यांनी 2 तास 17 मिनिटांत त्यांचं अर्थसंकल्पीय भाषण (Budget Speech Record) पूर्ण केलं. निर्मला सीतारमण यांनी 2020 मधील 2 तास 42 मिनिटांचं सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण वाचून माजी अर्थमंत्री जसवंत सिंह यांचा 2003 चा विक्रम मोडला.


माजी अर्थमंत्री जसवंत सिंह यांनीही रचलेला विक्रम 


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यापूर्वी जसवंत सिंह यांच्या नावावर सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण देण्याचा रेकॉर्ड होता. 2003 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री जसवंत सिंह यांनी 2 तास 13 मिनिटांचं सर्वात मोठं भाषण केलं होतं. सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना जसवंत सिंह यांनी हा रेकॉर्ड केला होता. जो 2020 मध्ये निर्मला सीतारमण यांनी मोडला. 


सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान कोणत्या अर्थमंत्र्यांच्या नावावर? 


सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड माजी अर्थमंत्री मोरारजी देसाईंच्या नावावर आहे. त्यांनी आतापर्यंत सर्वाधिक वेळा भारताचा अर्थसंकल्प अर्थमंत्री म्हणून 10 वेळा सादर केला आहे. यामध्ये आठवेळा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला आहे. तसेच, मोरारजी देसाई यांच्यानंतर सर्वाधिक नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम यूपीए सरकारच्या काळा अर्थमंत्री असलेल्या पी. चिदंबरम यांच्या नावावर आहे. यांच्यानंतर प्रणब मुखर्जी आणि यशवंत सिन्हा या दोघांच्या नावावर प्रत्येकी 8-8 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी सहावेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.