Union Budget 2022 LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारमण या संसदेत आज  आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होत. या अर्थसंकल्पात त्यांनी सिंचन-पिण्याचे पाणी वाढवण्यावर भर दिला आहे. जलसंपदा विकास मंत्रालयाच्या मदतीने देशातील 5 मोठ्या नद्या जोडण्याचे कामही केले जाणार आहे. या पाच नद्यांमध्ये दमणगंगा-तापी, पार-तापी-नर्मदा, गोदावरी-कृष्णा, कृष्णा-पेन्नार आणि  पेन्नार-कावेरी या नद्या जोडल्या जाणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील पार-तापी- नर्मदा, गोदावरी-कृष्णा आणि दमनगंगा-पिंजल या प्रकल्पांना जोडलं जाणार आहे. ज्याचा फायदा महाराष्ट्राला होणार आहे. 


देशात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर काम सुरू असून गंगेच्या काठावर राहणाऱ्या शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले आहे. शेती क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  देशात तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार असल्याचे अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितले. तसेच पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर होणार आहे. देशातील 9 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी नवीन योजना राबविणार आहे. आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणावर सरकारकडून धान्याची खरेदी करण्यात आली आहे. त्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. देशात मोठ्या प्रमाणावर तेलबिया आयात केल्या जातात, तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार शेतकऱ्यांना पिकावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणार आहे. तसेच नैसर्गीक शेतीसाठी, झिरो बजेट शेतीला प्रोत्साहन देणार, त्याचे नियोजन करण्यासाठी योजना राबविणार. ग्रामीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे. कृषी आधारीत स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देणार, युवकांना मदत करणा्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून भांडवल पुरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 25 हजार किमी राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी 20 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 


देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प सादर करत आहेत. कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारचे प्राधान्यक्रम काय असतील आणि त्यात नोकरदार आणि सर्वसामान्यांना काय मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होते.