Union Budget 2022 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) एक फेब्रुवारी, 2022 रोजी अर्थमंत्री म्हणून आपला चौथा अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर करणार आहेत. निर्मला सीतारमण मुळच्या तमिळनाडूतील मदुराई येथील असून, त्यांनी भाजपच्या प्रवक्त्या ते अर्थमंत्री होण्यापर्यंतचा मोठा पल्ला गाठला आहे. कोरोना संकटात देशातील जनतेसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्यापासून ते आर्थिक सुधारणांपर्यंत निर्मला सीतारमण यांनी सर्वसामान्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. अर्थमंत्र्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासावर एक नजर टाकुयात... 


अर्थमंत्र्यांचा परिचय 


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा जन्म तामिळनाडूतील मदुराई येथे 18 ऑगस्ट, 1959 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचं नाव नारायण सीतारमण आणि आईचं नाव सावित्री सीतारमण आहे. निर्मला यांनी तिरुचिरापल्ली येथील सीतालक्ष्मी रामास्वामी महाविद्यालयातून अर्थशास्त्रात पदवी मिळवली. सीतारमण यांनी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु युनिवर्सिटीमधून आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी जेएनयूमधून M.A. (Economics) आणि M.Phil पूर्ण केलं आहे. 


लंडनमध्येही केलंय काम 


निर्मला यांनी लंडनस्थित कृषी अभियंता असोसिएशनमध्ये अर्थशास्त्रज्ञांसोबत सहाय्यक म्हणून काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी लंडनमधील प्राइज वॉटरहाऊसमध्ये सिनिअर मॅनेजर (रिसर्च अँड अनालिसिस) म्हणून काम पाहिलं. निर्मला यांनी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसमध्येही काही काळासाठी काम केलं आहे.


भारतात परतल्यानंतर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या 


भारतात परतल्यानंतर निर्मला यांनी हैदराबाद येथील सेंटर फॉर पब्लिक पॉलिसी स्टडीजमध्ये उपसंचालक म्हणून काम केलं. शिक्षणाच्या आवडीमुळं त्यांनी हैदराबादमध्ये 'Pranava' नावाची प्रतिष्ठित शाळा सुरू केली. 2003-2005 पर्यंत त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य होत्या आणि त्यांनी महिला सक्षमीकरणाशी संबंधित विविध मुद्दे अतिशय ठळकपणे मांडले आहेत.


2008 मध्ये धरली भाजपची कास 


निर्मला यांनी 2008 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनवण्यात आलं. मार्च 2010 मध्ये त्यांना पक्षाचे प्रवक्ते बनवण्यात आलं. तेव्हापासून त्या पक्षाच्या पूर्णवेळ कार्यकर्त्या होत्या. 


मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळातही मिळालं स्थान 


निर्मला यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. त्यांना वाणिज्य आणि उद्योग व्यवहार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) करण्यात आलं. याशिवाय त्यांना अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्रिपदाची जबाबदारीही देण्यात आली होती. 2017 मध्ये त्यांना संरक्षण मंत्री करण्यात आलं. त्यानंतर 2019 मध्ये मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर आलं, त्यावेळी निर्मला यांना अर्थमंत्री बनवण्यात आलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha