मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर केला. आपल्या या पहिल्या अर्थसंकल्पात त्यांनी कृषी, शिक्षण, उद्योग, आरोग्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी तरतूद केली. विशेष म्हणजे सरकारने आपल्या या बजेटमध्ये आंध्र प्रदेश आणि बिहार सरकारसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. महाराष्ट्रासाठी मात्र कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. याच कारणामुळे महाराष्ट्रातील विरोधी बाकावरील नेत्यांकडून भाजपा तसेच मो मोदी सरकावर टीका केली जात आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनीही एक्स्वर प्रतिक्रिया देत भाजपावर हल्लाबोल केला आहे. 


आदित्य ठाकरे काय म्हणाले? 


सरकार वाचवण्यासाठी बिहार आणि आंध्र प्रदेश सरकारला निधी दिला जातोय, हे मी समजू शकतो. पण महाराष्ट्राचा नेमका दोष काय. महाराष्ट्र राज्य केंद्राला सर्वाधिक कर देतो. हाच महाराष्ट्राचा दोष आहे का. आम्ही राज्याला सर्वाधिक कर देतो पण अर्थसंकल्पात मात्र राज्याला काहीही मिळालेले नाही. अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा एकदातरी उल्लेख केला का? भाजपा महाराष्ट्राचा एवढा तिरस्कार का करते? भाजपा महाराष्ट्राचा एवढा अपमान का करते? असे रोखठोक सवाल आदित्य ठाकरे यांनी केले आहेत. 




भ्रष्ट सरकारकडून राज्याचा कारभार हाकला जातोय 


तसेच महाराष्ट्रासोबत केला जात असलेला दुजाभाव ही पहिलीच ओळ नाही. गेल्या दशकभरात महाराष्ट्रासोबत असे होत आहे. सध्या राज्यात असंवैधानिक सरकार आहे. सर्वाधिक भ्रष्ट सरकारतर्फे सध्या राज्यकारभार हाकला जातोय. असे असूनही सध्या राज्याला केंद्र सरकारकडून काहीही मिळत नाहीये. राज्यात मिंधे सरकारकडून महाराष्ट्राची लूट केली जात आहे. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष करातूनही जनतेची लूट होत आहे. महाराष्ट्राला सध्या असं सगळं भोगावं लागतंय, असे म्हणत त्यांनी भाजपा, एकनाथ शिंदे यांना लक्ष केलं.  


आंध्र प्रदेश, बिहारला नेमकं काय मिळालं?


दरम्यान, केंद्र सरकारने आंध्र प्रदेश आणि बिहार राज्यासाठी यावेळच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. या तरतुदीच्या माध्यमातून या राज्यांत पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे. तसेच नवे विमानतळ, नवे वैद्यकीय महाविद्यालये उभारले जाणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे सध्याच्या एनडीए सरकारला आंध्र प्रदेशमधील चंद्राबाबू नायडू आणि बिहारमधील नितीश कुमार यांच्या पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. या दोन पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास भाजपाचे सरकार पडू शकते. त्यामुळेच या नेत्यांना खुश ठेवण्यासाठी आंध्र प्रदेश आणि बिहार राज्यांसाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे, असा दावा केला जातोय.   


हेही वाचा :


Union Budget 2024 Live Highlights : अर्थसंकल्पानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांचे संसदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन 


खुशखबर! आता सोनं-चांदी होणार स्वस्त, सीमा शुल्कात घट करण्याचा केंद्राचा मोठा निर्णय


Union Budget 2024-25: मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प; काय स्वस्त, काय महाग? वाचा सगळी माहिती एका क्लिकवर