Elon musk offers : टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक असलेले एलन मस्क हे ट्वीटर कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. मस्क यांनी 54.20 डॉलर प्रति शेअर या दराने कंपनीचे शेअर रोख रक्कमेत खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. मस्क यांच्या या ऑफरच्या वृत्तानंतर ट्वीटरचे शेअर दर वधारले आहेत.
मस्क यांनी ट्वीटरमध्ये 9 टक्के शेअर खरेदी केले असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर आता मस्क ट्वीटर कंपनी खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहे. मस्क यांनी ट्वीटर कंपनीला दिलेल्या ऑफरची बातमी समोर येताच अमेरिकन शेअर मार्केटच्या प्री-ओपनींग सत्रात ट्वीटरच्या शेअर दरात 12 टक्क्यांनी वाढ झाली.
ट्वीटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांनी लिहिलेल्या पत्रात मस्क यांनी म्हटले की, मी कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या आहेत. सध्याच्या चौकटीत काम केल्यास कंपनीची भरभराट अशक्य आहे. त्यामुळे कंपनीमध्ये मोठे बदल होणे आवश्यक असल्याचे मस्क यांनी म्हटले. ट्वीटरमध्ये प्रचंड क्षमता असून त्याला वाव देण्याची आवश्यकता असल्याचे मस्क यांनी पत्रात म्हटले.
ट्वीटर कंपनीसाठी माझ्याकडून ही शेवटची आणि चांगली ऑफर आहे. कंपनीने या ऑफरवर गांभीर्याने विचार न केल्यास मी ट्वीटरमधील माझ्या गुंतवणुकीबाबत फेरविचार करेल असा इशाराही मस्क यांनी पत्रातून दिला असल्याचे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एलन मस्क यांना ट्वीटर कंपनीच्या संचालक मंडळात स्थान देण्याचा निर्णय झाला होता. याची घोषणा ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी केली होती. मात्र, एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या संचालक मंडळात सामील होण्यास नकार दिला असल्याचे अग्रवाल यांनी काही तासांनी म्हटले. पराग यांनी सांगितलं की, संचालक मंडळात सामील असोत किंवा नसोत, आम्ही आमच्या शेअर होल्डर्सच्या सूचना आणि मतांना नेहमीच महत्त्व देतो. एलॉन हे ट्विटरचे सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत आणि आम्ही त्यांच्या सूचनांसाठी तत्पर आहोत.