नवी दिल्ली: डिजिटल करन्सी बिटकॉइनमध्ये तीन वर्षानंतर तेजी आल्याचं पहायला मिळतंय. बिटकॉइनने आपले या आधीचे सर्व रेकॉर्ड मोडले असून त्याची किंमत आता 20 हजार डॉलर्सच्या पलिकडे गेली आहे. गुरुवारी एका बिटकॉइनची किंमत 22,655 डॉलर्स इतकी झाली आहे. रुपयाच्या बाबतीत बोलायचं तर आज एका बिटकॉइनची किंमत 16,93,972 इतकी आहे. बुधवारी पहिल्यांदाच 20 हजार डॉलर पार केलेल्या बिटकॉइनची किंमत गुरुवारी एका दिवसात 10.5 टक्क्यांनी वाढली.


किंमतीत चौपटीनं वाढ
कोरोनाच्या काळात सर्व व्यवहारांवर परिणाम होत असताना बिटकॉइनसाठी मात्र हे वर्ष चांगलं गेल्याचं दिसतंय. मार्चच्या तुलनेत त्याच्या किंमतीत जवळपास चौपट वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. या वर्षी बिटकॉइनच्या किंमतीत तब्बल 170 टक्क्यांची वाढ झाली आहे. कमी काळात जास्त फायदा मिळवण्यासाठी काही बड्या गुंतवणुकदारांनी बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्याने त्याच्या किंमतीत तेजी आल्याचं सांगण्यात येतंय.


सोन्यातील गुंतवणूक घसरली
मार्च महिन्यात एका बिटकॉइनची किंमत 5 हजार डॉलर इतकी होती. काही महिन्यातच ती आता 23 हजारांच्या जवळ पोहचली आहे. ऑगस्ट महिन्यानंतर सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्यानं बिटकॉइनच्या किंमतीत वाढ झाल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय. ऑगस्टनंतर बड्या गुंतवणुकदारांनी सोन्यातील गुंतवणूक काढून घेतली आणि ती बिटकॉइनमध्ये गुंतवली.


तेजी कायम राहण्याचा अंदाज
बिटकॉइनमध्ये ही तेजी कायम राहण्याची शक्यता असल्याचं मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलंय. त्यांच्या मते ऑक्टोंबर महिन्यानंतर बिटकॉइन मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली आहे. तसेच सोन्यातील गुंतवणूक कमी झाली आहे. येत्या काळात बिटकॉइनची ही तेजी कायम राहणार असल्याचंही स्पष्ट आहे.


काय आहे बिटकॉइन?
बिटकॉइन ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. डॉलर,रुपया किंवा इतर चलनाचा वापर ज्या पध्दतीनं केला जातो तशाच पध्दतीनं पण डिजिटल स्वरुपात बिटकॉइनचा वापर केला जातो. ऑनलाइन पेमेंटव्यतिरिक्त डॉलर किंवा इतर चलनामध्ये याचे रुपांतर केले जाऊ शकते. याची सुरुवात 2009 साली करण्यात आली आहे. आज याचा वापर ग्लोबल पेमेंट स्वरुपात करण्यात येतोय. याच्या खरेदी आणि विक्रीसाठी एक्सचेंजदेखील आहेत.