मुंबई : जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी एक असलेल्या फोर्ड मोटर (Ford Motor) कंपनीने भारतातील आपले दोन्ही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत चाललेल्या तोट्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीचे भारतीय युनिट देशात विक्रीसाठी वाहनांची निर्मिती थांबवणार आहे. यापूर्वी अमेरिकेच्या जनरल मोटर्सनेही 2017 मध्ये देशात कार विक्री बंद केली होती. फोर्डचे लोकल युनिट तोट्यात चालले होते. त्यात कोरोनामुळे कंपनीच्या अडचणीत भर पडली आणि त्यांचे नुकसान वाढले होते. फोर्टच्या कार्सच्या विक्रीतही देशात घट झाली होती.


जुलैपर्यंत कंपनी 4,50,000 युनिट्सच्या इन्स्टॉल्ड क्षमतेच्या सुमारे 20 टक्के काम करत होती. फोर्डने 1990 मध्ये भारतात व्यवसाय सुरू केला. मात्र, दोन दशकांहून अधिक काळ अस्तित्वात राहूनही ते भारतात यशस्वी होऊ शकले नाही. फोर्डचा भारतीय ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मार्केट शेअर फक्त 1.57 टक्के होता. देशातील कार कंपन्यांमध्ये फोर्ड नवव्या क्रमांकावर आहे.






भारतात फोर्ड कंपनी फिगो (Ford figo), एस्पायर (Ford Aspire), फ्रीस्टाईल (ford freestyle), इकोस्पोर्ट (Eco Sports) आणि एन्डेव्हर (ford endeavour) मॉडेल्सची विक्री करते. या सर्व कार्सची किंमत 7.75 लाख ते 33.81 लाख रुपयांपर्यंत आहे.


फोर्डने काही वर्षांपूर्वी एसयूव्ही सेगमेंटमधील एक प्रमुख कंपनी महिंद्रा अँड महिंद्रासोबत भागीदारी केली होती. परंतु दोन्ही कंपन्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला ही भागिदारी तोडण्याचा निर्णय घेतला. महिंद्रा अँड महिंद्राला या जॉईंच वेन्चरमधून सुमारे 1,400 कोटी रुपयांची गुंतवणूक करायची होती. पण कंपनीने ती आपल्या इलेक्ट्रिक वाहन प्रकल्पात गुंतवण्याच निर्णय घेतला आहे.