Banks Complaint : आता सर्व सरकारी बँकासाठी एकच हेल्पलाईन (Bank Helpline) असणार आहे. केंद्र सरकारने सर्व सरकारी बँकाना एकच हेल्पलाईन सुरु करण्यास सांगितलं आहे. आतापर्यंत बँकेसंदर्भात काही तक्रारी असल्यास ग्राहकांना त्या-त्या बँकेच्या हेल्पलाईनवर किंवा बँकेच्या संपर्क क्रमांकावर तक्रार करावी लागत होती. मात्र या बँकेच्या हेल्पलाईनवर ग्राहकांच्या समस्या सोडवल्या जात नव्हत्या. यामुळे अनेकांनी केंद्र सरकारकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 


सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांना ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एकच राष्ट्रीय हेल्पलाइन सुरू करण्यास सांगितलं आहे. तसेच हा हेल्पलाइन क्रमांक तीन ते चार अंकी असावा आणि या क्रमांकावर सर्व बँकांच्या तक्रारी करता येतील. या हेल्पलाईन क्रमांकावर अशी व्यवस्था असावी ज्यामध्ये ग्राहक आपली तक्रार कोणत्याही बँकेबाबत किंवा तिच्या कोणत्याही शाखेत किंवा विभागात नोंदवू शकेल. सप्टेंबरमध्ये या संदर्भात बँकांशी बोलणी झाली होती आणि आता या प्रस्तावावर काम सुरू करण्यात आलं आहे.


बँकेकडून समस्यांचं निवारण होत नसल्याचं ग्राहकांची तक्रार


बँकेच्या हेल्पलाइन किंवा संपर्क क्रमांकावर ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण होत नसल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. यानंतर सरकारने बँकांना एकाच हेल्पलाईनची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. सर्व बँकांची माहिती एकाच हेल्पलाइनवर असेल. याशिवाय हेल्पलाईनवर तक्रार आल्यानंतर बँकाना ठराविक वेळेत ग्राहकांच्या समस्या सोडवाव्या लागतील. हेल्पलाइनच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी समिती नियुक्त करण्यात येईल.


IDBI बँकेला 828 कोटींचा नफा


आयडीबीआय बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 828 कोटींचा नफा कमावला आहे. हा नफा गेल्या वर्षाच्या तुलनेत 46 टक्के जास्त आहे. बँकेचे एकूण उत्पन्न 6,605 कोटी रुपये आहे. एकूण NPA 21.85 टक्क्यांवरून 16.51 टक्क्यांवर आला आहे.


HUL च्या नफ्यात 22 टक्क्यांनी वाढ 


हिंदुस्तान युनिलिव्हरचा (HUL) नफा दुसऱ्या तिमाहीत 22.19 टक्क्यांवरून वाढून 2,670 कोटींवर पोहोचला आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरची एकूण कमाई 16.44 टक्क्यांवरून वाढून 15,253 कोटींवर पोहोचली आहे.