Patanjali Baba Ramdev : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) च्या मुंबई खंडपीठाने कर्जाच्या गर्तेत सापडलेल्या रोल्टा इंडिया (Rolta India) या कंपनीवर बोली लावण्याची परवानगी बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या पतंजली आयुर्वेदला दिली आहे. काही दिवसांपूर्वी पतंजलीनेच या कंपनीसाठी 830 कोटी रुपयांची बोली लावली होती.  


रोल्टा इंडिया कंपनीचं नेमकं काम काय?


दरम्यान, पुणेस्थित ॲशडॉन प्रॉपर्टीजने 760 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. त्यानंतर पतंजलीने  रोल्टा इंडिया या कंपनीवर 830 कोटी रुपयांची बोली लावली होती. कमल के सिंह यांनी 1989 मध्ये रोल्टा इंडिया कंपनीची स्थापना केली. संरक्षण क्षेत्रासाठी जीआयएस आणि भू-स्थानिक सेवांमध्ये काम करते. ही कंपनी सरकारच्या मालकीच्या भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या कन्सोर्टियमचा एक भाग आहे. संरक्षण मंत्रालयानं 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त वॉर एरिया मॅनेजमेंट सिस्टम प्रकल्पासाठी 2015 मध्ये विकास एजन्सी म्हणून निवडली होती. दरम्यान, रोल्टा इंडियाच्या स्थावर मालमत्तांची किंमत मोठी आहे.


कंपनीवर किती कर्ज?


हा प्रकल्प 2018 मध्ये बंद झाला होता. ज्यामुळं रोल्टा इंडिया कर्जाच्या ओझ्याखाली दबली गेली. रोल्टा इंडिया सप्टेंबर 2018 मध्ये दिवाळखोरी न्यायालयात पोहोचली, जेव्हा युनियन बँक ऑफ इंडियाने NCLT मुंबईकडे याचिका दाखल केली. रोल्टा इंडियाकडे सुमारे 14,000 कोटी रुपयांचे एकूण थकीत कर्ज आहे. यावर, युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील कंसोर्टियमकडे एकूण 7,100 कोटी रुपये आणि सिटीग्रुपच्या असुरक्षित विदेशी रोखेधारकांना 6,699 कोटी रुपये देणे बाकी आहे.


बाबा रामदेव यांना ही IT कंपनी का खरेदी करायचीय? 


रोल्टा इंडियाच्या स्थावर मालमत्तांची किंमत त्याच्या सॉफ्टवेअर विभागापेक्षा जास्त आहे. कंपनीकडे मुंबई, कोलकाता आणि वडोदरा येथे प्रमुख स्थावर मालमत्ता आहेत. एका अहवालानुसार, मुंबईत सुमारे 40 हजार चौरस फुटांची एक फ्रीहोल्ड इमारत आहे आणि MIDC आहे. अंधेरी पूर्व येथे 1 लाख चौरस फुटांपेक्षा जास्त भाडेतत्त्वावरील चार इमारती आहेत. तसेच रोल्टा इंडियाकडे SEEPZ, अंधेरी वेस्ट (मुंबई) मध्ये एकूण 65,000 चौ.फूट पेक्षा जास्त आठ लीजहोल्ड युनिट्स आहेत. इतर मालमत्तांपैकी, या कंपनीचे लेक होम्स कॉम्प्लेक्स, पवई येथे सुमारे 1300 चौरस फुटांचे सहा फ्लॅट आहेत. याशिवाय, लॉर्ड सिन्हा रोड, कोलकाता आणि आरसी दत्त रोड, वडोदरा येथे त्याची आणखी दोन व्यावसायिक कार्यालये आहेत.


महत्वाच्या बातम्या:


Coronil औषधा संदर्भातील बाबा रामदेव यांचा दावा खोटा, IMA ने आरोग्यमंत्र्यांकडे मागितले स्पष्टीकरण