Apple Layoffs 2023 : टेक क्षेत्रातील नोकरकपातीचं लोण आता Apple कंपनीतही पसरलं आहे. आतापर्यंत नोकरकपातीपासून (Layoffs) दूर असलेली ही कंपनी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार करत आहे. आयफोनचं (iPhone) उत्पादन करणारी ही कंपनी कॉर्पोरेट रिटेल विभागातील काही कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे. असं झाल्यास अॅपलने केलेली ही पहिलीच नोकरकपात असेल. मंदीमुळे (Recession) गेल्या वर्षभरापासून टेक क्षेत्रात कर्मचारी कपातीचे संकट पाहायला मिळत आहे. ट्विटर, गुगल, अॅमेझॉन, मेटा यांसारख्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केली आहे.
खरंतर अॅपल कंपनी आतापर्यंत नोकरकपातीपासून दूर राहिली होती आणि इतर मार्गांनी खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत होती. परंतु आता काही कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची टांगती तलवार लटकत आहे. Apple च्या डेव्हलपमेंट अँड प्रिझर्व्हेशन विभागात काम करणार्या कर्मचार्यांना या कपातीचा फटका बसणार आहे. दरम्यान कंपनीने मात्र अद्याप या कपातीविषयी अधिकृत माहिती जारी केलेली नाही.
Apple रिटेल स्टोअरच्या जबाबदारी काय?
हा विभाग जगभरातील Apple रिटेल स्टोअर्स तयार करण्यासाठी आणि देखरेखीसाठी जबाबदार आहे. सध्या, किती कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याचा धोका आहे हे निश्चित झालेलं नाही. परंतु ही संख्या कमी असण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. खराब आर्थिक परिस्थिती आणि खर्चामुळे त्रस्त झालेल्या टेक क्षेत्रातील इतर कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात लोकांना कामावरुन कमी केलं आहे.
दरम्यान, कंपनीकडून ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाईल ते पुन्हा कंपनीत अर्ज करु शकतात, असं म्हटलं जात आहे. एवढंच नाही तर कंपनीतून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना चार महिन्यांचा पगारही दिला जाणार आहे.
अॅपलमध्ये 1.64 लाख कर्मचारी
मागील आर्थिक वर्षात सप्टेंबरपर्यंत अॅपलमध्ये 1.64 लाख कर्मचारी काम करत होते. कोविड महामारीच्या काळात कंपनीने गुगल, अॅमेझॉनसारख्या मोठ्या प्रमाणावर लोकांची भरती केली नाही. परंतु यानंतर Google आणि Amazon सारख्या कंपन्यांना हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करावं लागलं.
हेही वाचा
Indian IT Industry: मंदीचा परिणाम! नव्या आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रात 40 टक्के नोकऱ्यांची घट?