नवी दिल्ली : महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी आठवड्यांचे कामाचे तास नेमके किती असावेत या वादात उडी घेतली आहे. एल अँड टी ग्रुपचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यन यांनी त्यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना संबोधित करताना एका आठवड्यात 90 तास काम करायला पाहिजे, असं म्हटलं होतं. त्यानंतर सुब्रह्मण्यन यांच्यावर टीकेची झोड उठली होती. आनंद महिंद्रा यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युवा महोत्सवात यासंदर्भात भाष्य केलं. ते म्हणाले, खरा प्रश्न किती तास काम करता हा नसून गुणवत्तापूर्ण निर्मितीचा आहे.
आपल्याला कामाच्या दर्जा आणि गुणवत्तेवर भर दिला पाहिजे,आपण काम किती तास करतो याचा विचार करणं आवश्यक नाही. हा प्रश्न 40 तास, 70 तास किंवा 90 तासांचा नाही. तुम्ही केलेल्या कामानंतर कशा प्रकारचा आऊटपूट मिळतो ते महत्त्वाचं आहे, असं आनंद महिंद्रा म्हणाले. फक्त 10 तासांचं चांगलं काम देखील महत्त्वाचा बदल घडवू शकतं, असं ते म्हणाले.
आनंद महिंद्रा यांनी वैविध्यपूर्ण जीवनासंदर्भात देखील बाष्य केलं. नागरिकांना वेगवेगळ्या क्षेत्रासंदर्भात गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. कला आणि संस्कृती तुम्हाला चांगला निर्णय घेणारा व्यक्ती बनवू शकते. तुम्हाला जेव्हा कला, संस्कृती संदर्भात माहिती असते. तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती असतात तेव्हा तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता, असं आनंद महिंद्रा म्हणाले.
कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवता तेव्हा त्याचं प्रतिबिंब वैयक्तिक निर्णयक्षमतेत आणि सृजनशीलतेमध्ये होतं, असंही आनंद महिंद्रा म्हणाले. तुम्ही जर फक्त पूर्णवेळ ऑफिसमध्ये असाल, तुमच्या कुटुंबासोबत नसाल किंवा इतरांच्या कुटुंबासोबत नसाल तर लोकांना नेमकं काय खरेदी करायचं आहे हे तुम्हाला कसं कळेल, असा सवाल देखील आनंद महिंद्रा यांनी केला.
एक्स प्लॅटफॉर्मवर काम सोडून किती वेळ घालवता अशा स्वरुपाच्या फॉलोअर्सकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांबाबत देखील आनंद महिंद्रा यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, मला स्पष्ट करु द्या, मी एकटा आहे म्हणून एक्स वर आहे असं नाही.माझी पत्नी चांगली आहे, तिच्यासोबत वेळ घालवायला मला आवडतं. एक्सवर मी मित्र तयार करण्यासाठी आलेलो नाही. मी इथं आहे कारण लोकांना माहिती नाही की हे किती शक्तिशाली व्यावसायिक साधन आहे. मला इथं, 11 दशलक्ष लोकांकडून प्रतिसाद मिळत असतो.
एल अँड टीचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यन यांनी एका आठवड्यात 90 तासांच्या कामाच्या संकल्पनेचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांपुढं मांडला होता. कर्मचाऱ्यांनी रविवारी देखील काम करायला पाहिजे, असं ते म्हणाले होते. तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहत बसणार, असं ते म्हणाले होते. त्यावरुन त्यांच्यावर टीका झाली होती.
इतर बातम्या :
मी तर आठवड्यात 100 तास काम करतो, 90 तास काम करण्याच्या वादात आणखी एका व्यवसायिकाची उडी