Air India Express Flight Cancelled: एअर इंडिया एक्सप्रेसनं (Air India Express) 'सिक लीव्ह'वर गेलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. एअर इंडिया एक्सप्रेसनं अशा कर्मचाऱ्यांना कंपनीचा दैनंदिन कारभारात अडथळा आणल्याबद्दल आणि नियुक्तीच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी मानून त्यांना बडतर्फीची नोटीस धाडली आहे. दरम्यान, एअर इंडिया एक्सप्रेसच्या 100 हून अधिक क्रू मेंबर्सनी बुधवारी आजारी असल्याची सबब देत अचानक रजा घेतल्या. त्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसची 80 हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली. या प्रकाराबाबत असंही सांगितलं जात आहे की, कर्मचाऱ्यांचं अचानक रजा घेणं म्हणजे, एक प्रकारचा संपच आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, 100 हून अधिक क्रू मेंबर्स अचानक आजारी रजेवर गेल्यामुळे, गेल्या दोन दिवसांत एअरलाईनला 90 उड्डाणं रद्द करावी लागली आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेसचे वरिष्ठ केबिन क्रू मेंबर्स आपल्या मागण्यांसाठी एकप्रकारे संपावर गेले आहेत.


25 वरिष्ठ क्रू मेंबर्स टर्मिनेट, सूत्रांची माहिती 


एअर इंडिया एक्सप्रेसच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेसकडून सीक लिव्हप्रकरणी तब्बल 25 वरिष्ठ क्रू मेंबर्स टर्मिनेट करण्यात आलं आहे. सोबतच, आज एका टाऊन हॉल मिटिंगचे देखील मॅनेजमेंटकडून आयोजन करण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यानं 13 मेपर्यंत एअर इंडिया एक्सप्रेसकडून कमी उड्डाणांसह शेड्युल्ड करण्यात येणार आहे. 


केबिन क्रू सदस्यांनी आजारी असल्याची तक्रार केली, त्यांचे मोबाईलही बंद : एअर इंडिया एक्सप्रेस 


गेल्या मंगळवारी, जेव्हा विमान कंपनीची अनेक उड्डाणं निघणार होती, तेव्हा शेवटच्या क्षणी केबिन क्रू सदस्यांनी आजारी असल्याची तक्रार केली आणि त्यांचे मोबाईल फोन बंद केले. बुधवारी एअरलाइनचे सीईओ म्हणाले, "काल संध्याकाळपासून, आमच्या 100 हून अधिक केबिन क्रू सहकाऱ्यांनी त्यांच्या नियोजित फ्लाइट ड्युटीपूर्वी शेवटच्या क्षणी आजारी पडल्याची नोंद केली आहे, ज्यामुळे आमच्या कामकाजात गंभीर व्यत्यय आला आहे...'


त्यानंतर एअर इंडियानं 13 मे पर्यंत उड्डाण सेवा कमी कमी उड्डाणांसह सुरू ठेवणार असल्याची घोषणा केली, ज्यामुळे मंगळवारी रात्रीपासून 100 हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आली आहे, यामुळे सुमारे 15,000 प्रवाशांवर परिणाम झाला. एअरलाइनचे सीईओ आलोक सिंह या सर्व प्रकाराबाबत म्हणाले की, "संपूर्ण नेटवर्क प्रभावित झालं आहे, ज्यामुळे आम्हाला पुढील काही दिवसांमध्ये वेळापत्रक कमी करण्यास भाग पाडलं जात आहे."


MoCA नं मागवला अहवाल 


MoCA नं एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्द करण्याबाबत अहवाल मागवला आहे. सोबतच समस्यांचं त्वरित निराकरण करण्यास सांगितलं आहे. तसेच, डीजीसीएच्या निकषांनुसार प्रवाशांना सुविधा देण्याची त्यांना सूचना देण्यात आली आहे.