ADB on India GDP : आशियाई देशांच्या विकासाची गती मंदावणार असल्याचा अंदाज आशियाई विकास बँकेने (The Asian Development Bank ) व्यक्त केला आहे.  भारताचा जीडीपी 2022 मध्ये 7.2 टक्के राहणार (India GDP Forecast) असून वर्ष 2023 मध्ये 7.8 टक्के राहण्याचा अंदाज  आशियाई विकास बॅंकेने वर्तवला आहे. भारतासह अनेक देशांचा जीडीपी घसरणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्याशिवाय, महागाईदेखील वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


आशियाई विकास बँकेने भारताच्या विकास दरात घट केली आहे.  एप्रिल 2022 या वर्षात सालात भारताचा जीडीपी 7.5 टक्के,  तर वर्ष 2023 साठी आठ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. दक्षिण आशियाई देशांच्या विकास दरात मोठी घसरण होण्याचा अंदाज आशियाई विकास बँकेने वर्तवला आहे.


दक्षिण आशियातील महत्त्वांच्या देशांपैकी असलेले श्रीलंका आणि पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. श्रीलंकेत मोठं आर्थिक अरिष्ट निर्माण झालं आहे. तर, दुसरीकडे पाकिस्तानमध्ये अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. त्याच्या परिणामी विकासगती मंदावणार असल्याचे आशियाई विकास बँकेने म्हटले आहे. 


आशियाई देशातील महागाई दरही वाढणार 


वर्ष 2022 मध्ये  महागाई दर 4.2 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याआधी या वर्षात महागाई दर 3.7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर, पुढील वर्षात हा महागाईचा दर 3.5 टक्के राहणार आहे. याआधी हा दर 3.1 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. 


इंधन दरवाढ, अन्नधान्यांच्या वाढत्या किंमतींमुळे महागाई दरात वाढ होणार असल्याचे आशियाई विकास बँकेने म्हटले आहे. मात्र, महागाई वाढीचा वेग जगातील इतर भागाच्या तुलनेत आशियाई देशात तुलनेनं कमी असल्याचे आशियाई विकास बँकेच्या अहवालात म्हटले आहे. 


विकास दर घसरण्याची काय आहेत प्रमुख कारणं? 


चीनमध्ये कोरोना महासाथीच्या भीतीमुळे लॉकडाउन लावले जात आहे. या सततच्या लॉकडाउनमुळे चीनमधील अर्थचक्र बिघडले आहे. तर, प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये अधिक आक्रमकपणे आर्थिक विकासाकडे पावलं टाकली जात आहे.  रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगातील अर्थचक्रावर परिणाम झाला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याचा परिणाम आर्थिक विकासावरही दिसून येत आहे.