मुंबई : अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर अमेरिकेत लाच दिल्याचा तसेच फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपांनंतर भारतीय शेअर बाजारात लोकांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेत झालेल्या या आरोपांनंतर आदानी उद्योग समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत. यातील चार कंपन्यांना तर थेट लोअर सर्किट लागले आहे. दरम्यान, अमेरिकेने केलेल्या या आरोपांवर अदानी उद्योग समूहाकडून स्पष्टीकरण आले आहे. अमेरिकेत करण्यात आलेले सर्व आरोप अदानी उद्योग समूहाने फेटाळले आहेत. 


कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार


अदानी समूहाने अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने केलेले आरोप फेटाळले आहेत. अदानी ग्रीनच्या संचालकांवर केलेले आरोप निराधार असल्याचं अदानी उद्योग समूहाने म्हटलंय. अभियोगातील आरोप हे आरोप आहेत आणि प्रतिवादी दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष मानले जातात, असं अदानी समूहाने म्हटले आहे. आम्ही सर्व ते शक्य कायदेशीर मार्ग शोधू असं अदानी उद्योग समूहाने प्रसिद्ध केलेल्या आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे.






आम्ही कायद्याचे पालन करतो, सर्व मानकांचे पालन करतो


आमच्या उद्योग समूहात प्रशासनात नेमहीच उच्च दर्जा राखला जातो. तसेच पारदर्शकता, कायद्याचे पालन, सर्वोच्च मानकांचे पालन केले जाते. आम्ही त्यासाठी प्रतिबद्ध आहोत. आम्ही कायद्याचे पालन करणारे आहोत, असं आम्ही आमच्या स्टेकहोल्डर्स, पार्टनर्स तसेच कर्मचाऱ्यांना आश्वस्त करतो. आम्ही सर्व कायद्यांचे पालन करतो, असंही अदानी उद्योग समूहाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.


गौतम अदानी यांच्यावर नेमका आरोप काय?


भारतातील सर्वांत मोठा सौरउर्जी निर्मिती प्रकल्पाचे कंत्राट मिळावे यासाठी गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांनी भारतीय अधिकाऱ्यांना सुमारे 250 दशलक्ष डॉलर्स देण्याचे मान्य केले होते. या प्रकल्पातून पुढच्या 20 वर्षांत साधारण 2 अब्ज डॉलर्सचा नफा मिळणार होता. तसेच कर्जदार आणि गुंतवणूकदार यांच्यापासून हा भ्रष्टाचार लपवून गौतम अदानी आणि अदानी ग्रीन एनर्जीचे सीईओ विनीत जैन यांनी 3 अब्ज डॉलर्स किमतिचे बॉण्ड्स आणि रोखे जमा केले होते, असाही आरोप करण्यात आला आहे. 


हेही वाचा :


मोठी बातमी! लाचखोरी, फसवणुकीच्या आरोपांनंतर गौतम अदानींचा मोठा निर्णय; तब्बल 600 दशलक्ष डॉलर्सचे रोखे रद्द


Adani Group: अदानी ग्रुपवर 250 दशलक्ष डॉलर्सच्या लाचखोरीचा गंभीर आरोप, अमेरिकेत गुंतवणूकदारांची फसवणूक केली? काय आहे प्रकरण?


Share Market : शेअर बाजारात लाल चिखल! लोअर सर्किटमुळे 'या' दिग्गज शेअर्सची राखरांगोळी, शेअरहोल्डर्सचे कोट्यवधी बुडाले!