मुंबई : सिमेंट व्यवसायात अदानी समूह मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. अदानी समूहाने जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी होल्सीम ग्रुपचा (Holcim Group) संपूर्ण भारतातील व्यवसाय ताब्यात घेण्यासाठी करार केला आहे. भारतातील दोन सर्वात मोठ्या सिमेंट कंपन्यांपैकी अंबुजा आणि ACC सिमेंट मधील होल्सीम ग्रुपची संपूर्ण भागीदारी 10.5 अब्ज डॉलरमध्ये (सुमारे 81 हजार कोटी रुपये) विकत घेण्यासाठी अदानी समूहाने मोठा करार केला आहे.
अदानी समूहाचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे अधिग्रहण आहे. याशिवाय, पायाभूत सुविधा आणि साहित्य क्षेत्रात भारताचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे संपादन आहे. ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी मागील आठवड्यात या करारासंदर्भात अबुधाबी आणि लंडनला गेले होते.
ACC म्हणजेच असोसिएठ सीमेंट कंपनीज आणि अंबुजा कंपनीत होल्सीम ग्रुपचा मालकी हक्क आहे. ही स्वित्झर्लंडची बिल्डिंग मटेरियल कंपनी आहे. ही कंपनी 17 वर्षांपूर्वी भारतात दाखल झाली होती. ही जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी समजली जाते. होल्सीम ग्रुपची अंबुजा सिमेंट्समध्ये 63.19 टक्के भागीदारी आहे, जो आता अदानी ग्रुपच्या मालकीचा असेल. त्याचप्रमाणे एसीसीमध्ये होल्सीम ग्रुपचा 54.53 टक्के वाटा होता.
सिमेंट विभागात गौतम अदानी यांची एन्ट्री
JSW प्रमाणेच, अदानी समूहाने अलीकडेच सिमेंट विभागात प्रवेश केला आहे. दोघेही आक्रमकपणे सिमेंट व्यवसाय वाढवत आहेत. सध्या आदित्य बिर्ला समूहाची अल्ट्राटेक ही भारतीय सिमेंट बाजारपेठेतील सर्वात मोठी कंपनी आहे. अल्ट्राटेकची वार्षिक क्षमता 117 दशलक्ष टन आहे. अंबुजा सिमेंट आणि ACC लिमिटेड यांची एकत्रित क्षमता वार्षिक 66 दशलक्ष टन आहे. म्हणजेच आता अदानी समूह भारतीय सिमेंट बाजारात थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
नियामक मंजुरीनंतर करार पूर्ण करणार
नियामक मंजुरीनंतर हा करार पूर्ण केला जाईल. अंबुजा सिमेंटची खुली ऑफर किंमत 385 रुपये प्रति शेअर आहे आणि ACC साठी ती 2,300 रुपये प्रति शेअर आहे. अंबुजा सिमेंट आणि ACC मधील Holcim चे स्टेक आणि ओपन ऑफर विचारात घेतलेली किंमत $10.5 बिलियन आहे. "विकासाच्या पुढील युगाचं नेतृत्त्व करण्यासाठी अदानी समूह भारतातील आमचा व्यवसाय अधिग्रहित करत आहे याचा मला आनंद आहे," असं होल्सीम लिमिटेडचे सीईओ जॉन जॅनिश म्हणाले.
अबुजा आणि ACC हे भारतातील दोन प्रमुख सिमेंट ब्रँड
अंबुजा आणि ACC हे भारतातील दोन आघाडीचे सिमेंट ब्रँड आहेत. दोन्ही कंपन्यांचे 23 सिमेंट प्लांट, 14 ग्रायंडिंग स्टेशन, 80 रेडी-मिक्स कॉंक्रिट प्लांट आणि देशभरात 50 हजारहून अधिक चॅनल पार्टनर आहेत. ACC ची सुरुवात 1 ऑगस्ट 1936 रोजी मुंबईत झाली होती. त्यावेळी अनेक ग्रुपने मिळून याचा पाया रचला होता. तर अंबुजा सीमेंटची स्थापना 1983 मध्ये नरोत्तम सेखसरिया आणि सुरेश नियोतिया यांनी केली होती.