Kashi Vishwanath Mandir : वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरात (Kashi Vishwanath Mandir) 50 पुजाऱ्यांची (priests) नेमणूक करण्यात येणार आहे. यामध्ये मुख्य पुजाऱ्यांना 90 हजार रुपयांचं मानधन देण्यात येणार आहे. याशिवाय कनिष्ठ पुजारी आणि सहायक पुजारी यांनाही मानधन मिळणार आहे. काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टची 105 वी बैठक पार पडली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, तब्बल 41 वर्षांनंतर पुजारी सेवा नियमांबाबत एकमत झाले आहे.
कनिष्ठ पुजाऱ्यांना 80 हजार तर सहाय्यक पुजाऱ्यांना 65 हजार रुपयांचे मानधन
मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसी येथील श्री काशी विश्वनाथ मंदिरात पुजाऱ्यांची नमणुक करण्यात येणार आहे. यामध्ये मुख्य पुजाऱ्याला 90 हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे. त्याचबरोबर कनिष्ठ पुजाऱ्यांना 80 हजार रुपयांचे आणि सहाय्यक पुजाऱ्यांना 65 हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे.
भरतीसाठी जाहिरात काढण्यात येणार
मंदिरात पुजाऱ्यांची एकूण 50 पदे भरणार असून, त्यावर भरतीसाठी जाहिरातही काढण्यात येणार असल्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय श्री काशी विश्वनाथ मंदिरातर्फे जिल्ह्यातील सर्व संस्कृत विद्यार्थ्यांना मोफत कपडे व पुस्तके दिली जाणार आहेत. मंदिरातर्फे प्रथमच संस्कृत ज्ञान स्पर्धाही आयोजित केली जाणार आहे. याशिवाय शहरात अनेक ठिकाणी बाबांच्या भोग प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाला अनुदान मिळणार आहे.
वेदमंत्रांनी झाली बैठकीची सुरुवात
1983 मध्ये मंदिर ताब्यात घेतल्यानंतर, पुजारी सेवा नियमावली रद्दबातल झाली होती. मात्र, आता नव्या बदलांनंतर त्याची अंमलबजावणी कधी होणार आहे. त्यानंतर काशी विश्वनाथ मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याला 90 हजार रुपये, कनिष्ठ पुजाऱ्याला 80 हजार रुपये आणि सहाय्यक पुजाऱ्याला 65 हजार रुपये मानधन मिळणार आहे. दरम्यान, या बैठकीत संस्कृत शाळेतील इयत्ता 6 वी ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या सर्व मुलांना मोफत वह्या व कपडे देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यावर ट्रस्टने या उदात्त कार्याचे कौतुक करून तत्काळ मान्यता दिली आहे.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संस्कृत शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना पुस्तकांचा एक संच देण्याबाबतही बोलले. त्यावर ट्रस्टच्या अध्यक्षांनीही सहमती दर्शवली. बैठकीत ट्रस्टच्या सदस्यांनी सर्व शाळांना वाद्ये पुरविण्याबाबतही चर्चा केली. यावर संमतीही देण्यात आली. काशी विश्वनाथ मंदिरात प्रथमच संस्कृत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आंतरशालेयांसह सर्व स्तरावर स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून, यामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
दररोज होणार प्रसादाचं वाटप
काशीमध्ये आई अन्नपूर्णा आणि बाबा विश्वनाथ यांच्या आशीर्वादाने कोणीही उपाशी झोपत नाही. त्याच धर्तीवर शहरातील स्थानके, बसस्थानक आणि घाटांवर राहणाऱ्या लोकांना बाबांचा प्रसाद दररोज वाटप करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंदिराच्या अन्नक्षेत्रात प्रसाद तयार करून तो मंदिरातील वाहनांमध्येच पॅकिंग केल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी त्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. ट्रस्टच्या बैठकीत वास्तुविशारद कंपनीला जमीन आणि इमारतीच्या वापरासाठी पॅनेल बनविण्यावरही चर्चा झाली. आगामी काळात पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांच्या सुविधांमध्ये वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला. ज्यामध्ये जमीन व इमारतींची खरेदी, रस्ते रुंदीकरण, पार्किंग आदींबाबतही चर्चा झाली.
महत्वाच्या बातम्या: