Agricultural Export Cluster News : केंद्र सरकार (Central Govt) शेतीसाठी 100 निर्यात क्लस्टर (Export Cluster) तयार करण्यासाठी 18,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान (Agriculture Minister Shivraj Singh Chauhan) यांनी दिली. कडधान्य उत्पादनाच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी सरकारनं 6800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह डाळी अभियानाची योजना आखली आहे. हवामान अनुकूल कृषी प्रणाली बनवली जात आहे. सरकार देशभरात 50,000 हवामान अनुकूल गावे वेगाने विकसित करत आहे. याशिवाय बियाणांच्या 1500 नवीन जाती विकसित केल्या जात असल्याचे चौहान म्हणाले. 


शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कृषी मंत्रालयाचे प्रयत्न 


शेतकऱ्यांना त्यांची डिजिटल ओळख दिली जाईल, त्यासाठी सरकार काम करत असल्याचे मंत्री चौहान म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवरही टीका केली. विरोधक शेतकऱ्यांना व्होट बँक मानत असल्याचे ते म्हणाले. कृषी क्षेत्रात कोणतीही समस्या नाही, असे कोण म्हणत असले तरी त्यावर उपायही आहेत. जटिल समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कृषी मंत्रालय शेतकरी आणि शेतकरी संघटनांसह सर्वांशी चर्चा करेल असंही ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेसनेही कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर टीका केली आहे. चौहान खोटे बोलत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. 


कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर गुन्हा दाखल करावा, विरोधकांची मागणी


कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संसदेत दिलेल्या माहितीप्रणाणे सरकार गरजेनुसार किमान आधारभूत किमतीत शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करते. याचा अर्थ सरकारने हे मान्य केले आहे की, गरज वाटली तर पिकांची खरेदी करेल अन्यथा गरज नसताना पिकांची खरेदी करणार नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला म्हणाले की, चौहान यांच्यावर देशाची आणि सदनाची दिशाभूल केल्याबद्दल विशेषाधिकार भंगाचा गुन्हा दाखल करावा. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह म्हणाले की, चौहान यांनी खतांच्या किमती 10 रुपयांनी कमी केल्याचा दावा केला असून तो पूर्णपणे खोटा आहे.


नरेंद्र मोदी सरकारचे व्हिजन डॉक्युमेंट सादर करताना चौहान म्हणाले की, सरकार वन हेल्थ ॲप्रोच (ओएचए) वर काम करत आहे. जे मानव, प्राणी, वनस्पती आणि पर्यावरण यांच्यातील आरोग्याच्या परस्परसंबंधांवर भर देत आहे .तसेच कृषी क्षेत्रात असणाऱ्या समस्यांवर सरकार काम करत असल्याचे कृषीमंत्री चौहान म्हणाले.


महत्वाच्या बातम्या:


कृषी उत्पादनांच्या भौगोलिक मानांकनात महाराष्ट्राचा पहिला नंबर! एकूण 38 शेती उत्पादनांना मिळालाय GI टॅग