रिश्ता, प्यार, ख्याल, दीदार और माफ़ी हैं।
इक 'शक' इनकी मौत के लिए काफ़ी है।।
संशय येणे हे जागरुकतेचे लक्षण असले तरी सतत संशय घेणे हा एक मानसिक आजारच आहे. (संशयाचा फायदा फक्त एका ठिकाणी मिळतो. तो म्हणजे आरोपीला न्यायालयात.)
संशयाने माणसाची नजर गढूळ होते. संशयी व्यक्तीसोबत जगणे म्हणजे एक प्रकारचा नरकवासच. त्यात पुन्हा 'विवाहबाह्य संबंध' म्हणजे लफड्याचा संशय असेल तर त्याला एक वेगळीच धार चढते.
अशाच एका संशयी बायकोला घेऊन सुजय सावंत नावाचा एक मेकॅनिक मानसतज्ज्ञ डाॅ. उदय देशपांडे यांच्याकडे येतो आणि 'मन सुद्ध तुझं' या मालिकेचा अकरावा भाग सुरू होतो. ही मालिका सध्या एबीपी माझा वाहिनीवर दर रविवारी प्रसारित होत आहे.
सुजयची पत्नी सुरेखा डाॅक्टरांच्या वेटिंग रूममध्ये बसलेली असतानाच तिची दातखिळ बसते. डाॅक्टर आणि नर्स तिला धरून केबिनमध्ये नेतात. बीपी तपासतात. तोवर ती भानावर येते.
सुरेखा डॉक्टरांना सांगते की, "आम्हाला एक छोटी मुलगी आहे. माझा नवरा वॉटर प्युरिफायर दुरुस्तीचे काम करतो. तसा खूप चांगला आहे. व्यसन करत नाही वगैरे. पण त्याचं समोर राहणार्या एका बाईसोबत लफडं आहे. त्या बाईला मुलंबाळं आहेत. तिचा नवरा दुबईला असतो. श्रीमंत आहे. अधून मधून येतो. परत जातो आणि ही बाई इकडे रंग उधळते."
डॉक्टर सुरेखाला विचारतात की,"तुला असा संशय का येतो?" तर सुरेखा सांगते की,"मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय की, ती बाई माझ्या नवर्याच्या स्कूटरवर बसून जाताना. पूर्वी नीटनेटके राहायला सांगितले तर दुर्लक्ष करायचा. पण आता उलटसुलट भांग पाडत बसतो. खिडकीत उभा राहून चहा पितो. लक्ष सगळं समोर. फोनला हात लावून हळूहळू बोलतो. कामावर गेला की माझा फोन घेत नाही. घेतला तरी तुटक बोलतो. त्यामुळे आता माझा जीव कशातच रमत नाही. सारखे तेच विचार येतात. जेवण गोड लागत नाही." बोलता बोलता सुरेखाच्या डोळ्यांत अश्रू येतात.
डॉक्टर विचारतात की, दातखिळ कधीपासून बसते. तर ती सांगते की, संशय आला तेव्हापासून.आता डॉक्टर या प्रकरणाचा ताबा घेतात आणि तिला विचारतात की, "या प्रकरणाला दुसरी बाजू असू शकेल असे तुला वाटत नाही का? तू तुझ्या नवर्याची तक्रार करतानाही त्याच्याबद्दल चांगलंच बोलत होतीस. मग कदाचित तूच 'चेन्नईच्या टॅक्सीत' बसली असशील!" (चेन्नईची टॅक्सी म्हणजे काय ते सुरेखाला कळत नाही. तेव्हा डॉक्टर तिला एक किस्सा सांगतात. ते एकदा चेन्नईला गेले असताना टॅक्सीवाला आपल्याला लुटतो की काय या संशयाने डॉक्टर घाबरले होते. मात्र टॅक्सीवाल्याने त्यांना सुखरूप हॉटेलवर पोचवले होते.)
शेवटी सुजय सावंतला डॉक्टर केबिनमध्ये बोलावतात. त्याच्याशी बोलल्यानंतर या संशयामागचा उलगडा होतो आणि तिघेही मनमोकळे हसू लागतात.
हा उलगडा नेमका काय होतो ते पाहण्यासाठी मालिकेचा अकरावा भाग यू ट्यूबवर पाहू शकता.
सत्याचा आधार नसलेला संशय म्हणजे विभ्रम. संशय ही शंभर पायांची गोम आहे. ती ज्याच्या डोक्यात घुसते त्याला ठार वेडे करते. तिचे एक दोन पाय तुटल्याने काहीच होत नाही. तिला पूर्णपणे डोक्याबाहेर फेकून देणे हाच जालीम इलाज असतो.
संशयाने अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त झालेली आहेत. लोकांनी एकमेकांचे खून केले आहेत. अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळेच केवळ संशयावरून न्यायालय कुणालाही फाशी देत नाही. आरोपीचा जीव गेल्यानंतर संशय खोटा निघाला तर त्याचा जीव परत कसा आणणार?
संशय घेतल्याने संशय वाढतो आणि विश्वास ठेवल्याने विश्वास वाढतो. जगण्यात आशय असेल तरच मजा आहे. संशयाने केवळ मातीच होते.
विनोद जैतमहाल इतर ब्लॉग
BLOG : हिरव्या देठाची पिवळी केळी