१ मार्चच्या रात्री कोलकात्यासह तमाम भारतात दिवाळीच जणू साजरी झाली. ही फटाक्यांची नव्हे तर फटक्यांची दिवाळी होती आणि ज्या फटाक्याने ही फटक्यांची दिवाळी साजरी केली तो फटाका होता संजू सॅमसन. केरळमध्ये स्थानिक क्रिकेटची नांदी झालेला संजू विंडिजविरुद्धच्या सुपर एट सामन्यात अविस्मरणीय खेळी खेळून गेला. समोरून ठराविक अंतराने विकेट्स पडत असताना संजू बर्फाची लादी डोक्यावर ठेवल्यागत ध्यानस्थ वृत्तीने खेळला. त्याच एकाग्र चित्ताने त्याने संघाला विजयासाठी ६ चेंडूंमध्ये ७ धावा हव्या असताना लीलया षटकार ठोकला. पुढच्या चेंडूवर विजयी चौकार मारल्यावर स्टेडियमसह अवघ्या भारतात आनंदोत्सव झाला. तर, संजूही त्यावेळी भावनिक झाल्याचं अवघ्या क्रिकेटरसिकांनी पाहिलं. कोलकात्यामध्ये रंगलेल्या नॉक आऊट मॅचचा गड सर झाला होता आणि तो गड सर करणारा सेनापती होता संजू सॅमसन.

Continues below advertisement

संजूचा केरळमधील स्थानिक क्रिकेटर ते भारतीय संघाचा यष्टीरक्षक सलामीवीर हा प्रवास बरंच काही सांगून जाणारा आहे. त्याचे वडील दिल्लीतील पोलीस कॉन्स्टेबल आणि फुटबॉलर. त्यांनी संजूमधली क्रिकेटची गुणवत्ता हेरली आणि त्या बीजाची मशागत करायचं ठरवलं. नोकरीतून निवृत्त होत ते केरळला गेले, तिथे संजूच्या करीअरला खरी दिशा मिळाली असं म्हणायला हरकत नाही.सुरुवातीची क्रिकेटमधील बाराखडी दिल्लीत गिरवल्यावर संजूच्या गुणवत्तेला जे पैलू पाडले गेले ते केरळमध्येच.

स्थानिक क्रिकेट, आयपीएल, भारतीय संघ अशा पायऱ्या तो चढत राहिला. त्याने अकरा वर्षांपूर्वी टी-ट्वेन्टी पदार्पण केलं. पुढच्या दशकात आंतरराष्ट्रीय मॅचेससाठी संघामध्ये आतबाहेर राहिला. अगदी अलिकडेच झालेल्या किवींविरुद्धच्या मालिकेत तसंच ऑसींविरुद्धच्या मालिकेतही त्याला फारसा ठसा उमटवता आला नव्हता.असं असलं तरीही स्थानिक क्रिकेटमध्ये तो धावांचा रतीब घालत राहिला. मुश्ताक अलीसह रणजी सामन्यांमध्येही त्याने केरळसाठी दमदार कामगिरी केली. त्याच वेळी आयपीएलच्या मैदानातही त्याचं नाव दुमदुमत होतं. राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व कऱणाऱ्या संजूने त्यांना फायनलची वेस गाठून दिली होती. या प्रवासावेळी राजस्थानचा कोच होता राहुल द्रविड.

Continues below advertisement

एकूणातच संजूच्या करीअरमध्ये द्रविडचं मार्गदर्शन अत्यंत बहुमोल असल्याचं त्याचे वडीलही सांगतात. संजूने द्रविडच्या त्याच भन्नाट टेम्परामेंट आणि संयमांचं दर्शन रविवाच्या प्रेशर मॅचमध्ये घडवलं. दुसरीकडून सातत्याने विकेट्स जात होत्या. टार्गेट २०० च्या जवळ होतं. तरी संजू अत्यंत फोकस्ड होता. चेहऱ्यावर दृढ निर्धार दिसत होता. फटक्यांची निवड अत्यंत अचूक होती. जोखीम न पत्करताही त्याने गाठलेला स्ट्राईक रेट आणि लगावलेले फटके सारंच अचंबित करणारं होतं. त्याची आकडेवारी पाहा.... ५० चेंडूंमध्ये नाबाद ९७ धावा, स्ट्राईक रेट १९४ चा. ज्यामध्ये होते १२ चौकार, ४ षटकार. त्याच्या याच मॅच विनिंग खेळीने भारताला सेमी फायनलचं दार उघडून दिलं. टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये आता निर्णायक सामने शिल्लक असतानाच्या या कामगिरीने त्याच्या करीअरला उभारी मिळेल हे निश्चित. याच संजूला याआधीच्या २०२४ च्या भारताने जिंकलेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये डग आऊटमध्ये बसून सामने पाहावे लागले होते. कारण, संघात स्पर्धा तगडी होती.

रोहित-विराट सलामीला खेळायचे तर, ऋषभ पंतसारखा यष्टीरक्षक फलंदाज संघात पाय रोवून होता. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये परिस्थिती वेगळी आहे. रोहित, विराटने टी-ट्वेन्टीमध्ये बॅट म्यान केलीय. यंग टीम इंडिया मैदानात उतरलीय. त्याच वेळी ईशान, अभिषेक या जोडीच्या साथीने सलामीचा तिसरा पर्याय आणि यष्टीरक्षक म्हणून संजूकडून अपेक्षा करण्यात येतायत. ज्याची पूर्तता या अत्यंत मोलाच्या सामन्यात त्याने केली. रविवारचा सामना जिंकल्यावर तो भरभरून व्यक्त झाला, तो म्हणाला, मी ५०-६० सामनेच खेळलो असेन, पण, मी १०० च्या आसपास सामने जवळून पाहिलेत. तेव्हा रोहित, विराटसारख्या महान क्रिकेटर्सचा खेळ बारकाईने अनुभवायला मिळाला.

आपल्या इनिंगदरम्यान गियर कसा आणि कधी बदलायचा याचा अभ्यास मी बारकाईने केला, ज्याचा मला फायदाच झाला. सध्या संघातली स्पर्धा तगडी आहे, त्यामुळे संजूला एक इनिंग खेळून भागणार नाहीये, धावांच्या राशी घालाव्या लागतील. ईडना गार्डन्सवर केलेल्या इनिंगसारख्या अनेक इनिंगच्या टोलेजंग इमारती त्याला उभाराव्या लागतील. ही इनिंग त्याच्या करीअरचा नवा टेकऑफ ठरावा, अशी अपेक्षा आता क्रिकेटरसिक करतायत.

हेही वाचा:

Ind vs WI T20 WC 2026: सूर्या ब्रिगेडचं 'मिशन सेमी फायनल'