Ind vs WI T20 WC 2026: टी-ट्वेन्टी विश्वचषक आता निर्णायक वळणावर पोहोचतोय. नॉक आऊटची अर्थात सेमी फायनलची फेरी सुरु व्हायचीय.त्याआधीच भारतासाठी रविवारी होत असलेली विंडिजविरुद्धची मॅच ही त्या अर्थाने नॉक आऊटची अर्थात क्वार्टरफायनलसारखीच मॅच आहे. जिंकेल तो पुढे, हरेल तो माघारी. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर हा महामुकाबला होणार आहे. स्पर्धेत दोन्ही संघांनी एकेकदा पराभवाची चव चाखलीय तीही दक्षिण आफ्रिकेकडूनच.

Continues below advertisement

सुपर एटमध्ये या दोन्ही संघांना दक्षिण आफ्रिकेने पराभूत केलं. आता तेच दोन्ही संघ आमने-सामने येतायत. विंडिजचा विचार केल्यास किंग, होप, हेटमायर, पॉवेल, चेस, रुदरफोर्ड, शेफर्ड, होल्डर अशी धोकादायक फलंदाजांची फळी आहे. ज्यांच्याकडे हुकमी षटकार ठोकण्याची किंवा टोलेजंग फटके खेळण्याची किमया आहे. ज्या एकमेव सामन्यात विंडिज पराभूत झाली ती मागची मॅच आठवा. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सात बाद ८३ अशा अडचणीत ते सापडलेले. तरीही त्यांनी १७६ ची मजल मारलेली. ही बाब भारत लक्षात ठेवेल हे नक्की. त्यामुळे कोणत्याही क्षणी सामन्याची ग्रिप न सुटू देणं हे महत्त्वाचं असेल. पॉवर-प्लेमधील खेळ सामन्याची सूत्र कुणाच्या हातात जातील हे ठरवू शकतो.

आपल्या संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सॅमसन-अभिषेक जोडीच सलामीला मैदानात उतरेल असं दिसतंय. पुढे ईशान, तिलक, सूर्यकुमार, पंड्या, दुबे, अक्षर अशी दमदार फळी आपल्याकडेही आहे. यात डावखुऱ्या फलंदाजांचा अधिक भरणा आहे. विंडिजचा डावखुरा स्पिनर मोतीला आपले फलंदाज कसे खेळतात यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. तसंच गोलंदाजीचा विचार करताना वरुण चक्रवर्तीची फिरकी विंडिज आर्मी कशी खेळतेय, यावरही सामन्याचं पारडं कुठे झुकेल हे ठरू शकतं. अगदीच वेगळी व्यूहरचना करायचा विचार भारताने केल्यास कुलदीप यादवला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकतं.

Continues below advertisement

चॅम्पियन गोलंदाज बुमराकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. तसंच क्षेत्ररक्षणाची बाजूही सामन्याचा कल ठरवू शकते. याचं कारण, म्हणजे ईडना गार्डन्सचं अवाढव्य मैदान. साहजिकच ग्राऊंड फिल्डिंग, मोक्याच्या क्षणी कॅचेस घेणं किंवा ते सुटणं सामन्याचा निकाल फिरवू शकतात. एकूणातच खेळाच्या प्रत्येक अंगामध्ये सरस ठरत जो संघ दबाव उत्तम हाताळेल तो सेमी फायनलचं तिकिट मिळवेल, ती टीम सूर्यकुमारची आपली टीम इंडिया असावी, अशा आपण भारतीय क्रिकेटरसिक म्हणून त्यांना शुभेच्छा देऊया.