क्रिकेटविश्वात सध्या सुपर ओव्हरची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. सुपर ओव्हर... ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये सामना टाय झाल्यानंतर निकालासाठी वापरला जाणारा नियम. ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटच्या उदयानंतर फुटबॉलच्या धर्तीवर क्रिकेटमध्येही बॉल आऊट आणि त्यानंतर सुपर ओव्हर असे नियम तयार केले गेले. आणि त्यामुळे चुरशीच्या सामन्यातला रोमांच आणखी वाढत गेला.
आपण सगळेजण नेहमी म्हणतो की CRICKET IS A GAME OF GLORIOUS uncertainty. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पण भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेत या सर्वांची परिसीमा गाठली गेली. हॅमिल्टनचा सामना असू देत किंवा वेलिंग्टनची चौथी ट्वेन्टी ट्वेन्टी. दोन्ही सामने अखेरच्या चेंडूपर्यंत रंगले. हे दोन्ही सामने न्यूझीलंडच्याच पारड्यात होते. पण ऐन मोक्याच्या क्षणी फलंदाजांनी खाल्लेली कच आणि मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूरनं डोक्यावर बर्फ ठेऊन थंड डोक्यानं केलेला अचूक मारा या सगळ्यामुळे दोन्ही सामने टाय झाले आणि न्यूझीलंडच्या नशीबात आलं पुन्हा सुपर ओव्हर नावाचं शुक्लकाष्ठ.
टीम इंडियाचा सलग चौथा 'सुप्पर' विजय, शार्दुल ठाकूर, लोकेश राहुलची जिगरबाज खेळी
हॅमिल्टनला सुपर ओव्हरमध्ये 18 धावांचं आव्हान देऊनही सामना न्यूझीलंडनं गमावला. आणि वेलिंग्टनला 14 धावा टीम इंडियानं पाचव्याच चेंडूवर पूर्ण करुन न्यूझीलंडच्या सुपर ओव्हरमधल्या कमनशिबीपणावर शिक्कामोर्तब केलं. खंर तर भारतानं आजवरच्या ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय़ क्रिकेटच्या इतिहासात कधीही सुपर ओव्हर खेळली नव्हती. 2007 च्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धचा सामना हा भारतासाठीचा आजवरचा एकमेव टाय सामना होता. पण त्यावेळी सुपर ओव्हरचा नियम अस्तित्वात नसल्यान बॉल आऊटवर निर्णय झाला आणि आपण तो सामना जिंकला. पण याऊलट सुपर ओव्हरच्या जन्मापासून आजपर्यंत म्हणजेच गेल्या बारा वर्षात न्यूझीलंडनं या मालिकेआधी सहा सुपर ओव्हर खेळल्या होत्या. त्यामुळे सुपर ओव्हरचा अनुभव न्यूझीलंडकडे बऱ्यापैकी होता. पण क्रिकेटमध्ये अनुभव प्रत्येक वेळी वरचढ ठरतोच असं नाही. आणि नेमकं तेच झालं. सुपर ओव्हर पुन्हा न्य़ूझीलंडवर उलटली. आणि भारतानं जवळपास हरलेली बाजी सुपर ओव्हरमध्ये जिंकली.
INDvsNZ | टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा सहा विकेट्सनी धुव्वा, लोकेश राहुल, श्रेयसची धडाकेबाज फलंदाजी
न्यूझीलंडचा वेलिंग्टनच्या सुपर ओव्हरमधला पराभव हा आजवरचा सातवा पराभव ठरला. आतापर्यंत खेळलेल्या आठ सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडनं 2010 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकमेव सामन्यात विजय मिळवला आहे. 2019 च्या इंग्लंडमधला वन डे विश्वचषक न्यूझीलंडनं सुपर ओव्हरमध्येच गमावला होता. ती जखम भरत असतानाच या दोन्ही पराभवांनी त्या जखमेवरची खपली काढण्याचं काम केलंय.
INDvsNZ T-20 Match | टीम इंडियाकडून सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा सनसनाटी पराभव
या पराभवानं न्यूझीलंडचा बदली कर्णधार टीम साऊदीनंही किवी चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा केली. कारण आठपैकी सात सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज टीम साऊदीच होता. गेली अनेक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या साऊदीच्या सुपर ओव्हरमधल्या अपयशानं न्यूझीलंडला बॅकफूटवर नेलं एवढं नक्की.
आयसीसी स्पर्धांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ चोकर्स म्हणून ओळखला जातो. आजतागायत दक्षिण आफ्रिकेला तो शिक्का पुसता आलेला नाही. हॅमिल्टन आणि वेलिंग्टनमधल्या पराभवानं न्यूझीलंडलाही असच कमनशिबी समजलं जाऊ लागलंय. त्यामुळे गुणवान आणि संयमी किवी खेळाडूंच्या या संघामागे लागलेलं हे शुक्लकाष्ठ लवकर टळो हीच इच्छा....
सुपर ओव्हर नावाचं शुक्लकाष्ठ
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
01 Feb 2020 09:45 PM (IST)
न्यूझीलंडचा वेलिंग्टनच्या सुपर ओव्हरमधला पराभव हा आजवरचा सातवा पराभव ठरला. आतापर्यंत खेळलेल्या आठ सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडनं 2010 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकमेव सामन्यात विजय मिळवला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -