कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट सुरु असतानाच, आपल्याकडे संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल जोरदार चर्चा सुरु झाली आहे. काही नागरिकांनी तर दुसरी लाट संपली असे मानून दैनंदिन व्यवहारास सुरुवात केली आहे. ज्या काही वेळेत बाजारपेठा खुल्या असतात त्या ठिकाणी जोरदार गर्दी असते. तर राज्यात काही ठिकाणी आंदोलन, मोर्चे सगळं काही नियमांना पायदळी तुडवून सुरु आहे. या सगळ्या प्रकारातून दुसरी लाट संपण्याची शक्यता कमी असून हीच लाट कायम राहील की अशी शंका वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करीत आहेत. पहिल्या लाटेपेक्षा संसर्गाची दुसरी लाट तीव्र असल्याचे परखड मत इंडियन जरनल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये मांडण्यात आले आहे. दुसऱ्या लाटेमध्ये वीस वर्ष वयोगट जर वगळला तर सर्वच वयोगटांमधील नागरिकांना संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. जर या दुसऱ्या लाटेला थोपवायचं असेल आणि तिसरी लाट येऊ द्यायची नसेल तर कोविडच्या अनुषंगाने असणाऱ्या नियमांचे पालन करावेच लागणार आहे. त्यासोबतच सर्व पात्र नागरिकांनी लस घेणे अतिशय गरजेची आहे. या मुळे आजराविरोधात लागणारे संरक्षण सर्व नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करून घेणे. दुसरी लाट चालू असतानाच केंद्र सरकारने कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी मिळून करावयाच्या व्यवस्थेसाठी 23 हजार 123 कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे कोरोनाच्या या आजाराचे महत्तव अजून अधोरेखित झाले असून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सबलीकरणाच्या दृष्टीने टाकलेले मोठे पाउल म्हणावे लागेल.  


गेल्या सव्वा वर्षाच्या कालावधीपासून राज्यातील आरोग्य व्यवस्था कोरोनाच्या या महामारीपासून लढा देत आहे. पहिल्या लाटेवर मत केल्यानंतर दुसऱ्या लाटेत मात्र कोरोनाच्या या विषाणूने रौद्र रूप धारण केल्याचे सगळ्यांनीच पहिले आहे. या अशा परिस्थतीत आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असल्याचे चित्र सर्वच ठिकाणी दिसत होते. डॉक्टर आणि त्यांचे सहकारी आहे त्या परिस्थतीत रुग्णांना उपचार देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत होते.त्या काळात उपचारासाठी अत्यावश्यक असणारी साधन सामुग्री अपुरी पडत असल्याने चांगलेच धाबे दणाणले होते. खासगी आरोग्य व्यवस्थेने बऱ्यापैकी भार आपल्या खांद्यावर घेतला होता. मात्र या काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे सबलीकरणाची गरज असल्याचे  लक्षात आले होते . आयसीयू, ऑक्सिजनयुक्त बेड्स, ऑक्सिजनची आणि औषधांची कमतरता या आणि अशा विविध गोष्टीची मोठी टंचाई निर्माण झाली होती. त्यावर सध्या तरी मात मिळवली आहे. मात्र  वैद्यकीय तज्ञांच्या विषाणूंमधील जनुकीय बदल हे होत राहिले तर त्याविरोधात लढा देण्यासाठी स्वतःची अशी अत्याधुनिक व्यवस्था गरजेची आहे.      
   
या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या कमी असतानाच राज्यातील आठ जिल्ह्यातील परिस्थिती ही काळजी करण्यासारखी आहे. या लाटेला कुणीही हलक्यात घेऊ नये. सध्या काही नागरिक  पद्धतीने फिरत आहेत की कोरोना संपला आता आपल्याला काही होणार नाही. मात्र यामुळे संसर्गाचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आंदोलने, सभा आणि मोर्चा यांचे आयोजन केले जात आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्याचप्रमाणे प्रशासनाने जे काही आहे त्याचे नागरिकांकडून सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. या सगळ्या प्रकारामुळे संसर्ग वाढत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. नागरिक सोयीची आकडेवारी बघून कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याचे सांगत असतात. मात्र शास्त्रीय दृष्टिकोनातून कोरोना बाधितांचे मृतांचे आकडे पाहताना विविध  गोष्टींचा करावा लागतो. मार्च 2020 सुरु झालेली लाट ज्यापद्धतीने जानेवारी-फेब्रुवारी महिन्या दरम्यान कमी झाली होती. अजूनही दुसऱ्या लाटेबाबत तशी परिस्थिती आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी आजही आपण संसर्गाच्या विळख्यात कायम आहोत असे समजून कोरोनाच्या अनुषंगाने वावर ठेवला पाहिजे. विशेष करून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात संसर्गाचा दर आहे.    


याप्रकरणी, मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ अविनाश सुपे सांगतात की, "केंद्र सरकारने जे  पॅकेज जाहीर  स्वागतार्ह आहे. कारण कोरोनाच्या बाबतीत कोणतेही भविष्य आताच वर्तविणे शक्य नाही. सध्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी होत असला तरी ती संपली असे म्हणण्यासारखी परिस्थिती आलेली नाही. आपल्या राज्यातील काही जिल्ह्यात अजूनही परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगूनच पावले उचलण्याची गरज आहे. देशाच्या इतर राज्यांपैकी केरळ येथील संसर्गाचा दर काही प्रमाणात वाढलेला आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ओसरण्यासाठी अजून अधिक कालावधी लागत आहे. काही जिल्ह्यात परिस्थिती चांगली असली तरी काळजी घेऊनच सुरक्षित वावर ठेवणे गजरेचे आहे. सध्या लसीकरणावर अधिक पद्धतीने जोर देणे गरजेचे आहे. अजून काही लोकांच लसीकरण अद्याप बाकी आहे. ज्या नागरिकांचे लसीकरणाचे दोन डोस झाले आहेत त्यांना प्रवास करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, मात्र  हे सर्वस्वी शासनाच्या धोरणांवर अवलंबून आहे. कारण दुसऱ्या लाटेतील अनुभव आपल्याला  गेलेला आहे. त्यामुळे काळजीपूर्वक पावले टाकणे कधीही समाजहिताचेच राहणार आहे.  


मे, 7 ला 'लहरों से डरकर नौका पार नहीं होती!' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, कोरोनाच्या साथीची सुरुवात झाल्यापासून अनेक तज्ञांनी कोरोनाच्या विषाणूची भविष्यातील वर्तनाविषयी अनेक भाकितं केली होती, मात्र अनेकांची भाकितं फोल ठरली आहे. कोरोना विरोधातील दुसऱ्या लाटेचे युद्ध सुरु असताना त्यात थोडे फार कुठे यश दिसायला लागत आहे, तो पर्यंत तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात आली आहे. कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा केंद्राचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी दिला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेस सामोरे जाण्यासाठी तयारी करा अशा सूचना केंद्राला दिल्या आहेत. साथीच्या आजरात पूर्वतयारी करणे केव्हाही चांगलेच आहे, कारण हे आपल्याला दुसऱ्या लाटेने दाखवून दिले आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांनी त्यामुळे उगाच चिंता बसण्याचे कारण नाही. सध्या सुरु असलेले लसीकरण जर वेगात झाल्यास मोठ्या लोकसंसंख्येला या आजरापासून संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम वेगवान होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहे. लसीकरणासोबत औषधांचा आणि ऑक्सिजनचा मोठा साठा सगळ्याच राज्यांना करून ठेवावा लागणार आहे.


 तिसरी लाट आली तरी जर मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण झाले तर त्याचा त्यांना फारसा त्रास होणार नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. तर लहान मुलांना त्या लाटेत त्रास होऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. या साथीच्या आजारात शेवटी स्वयंशिस्तता किती पाळतो यावर सगळे अवलंबून आहे. त्यामुळे नागरिकांनी तिसऱ्या लाटेचा विचार न करता सध्या ज्या पद्धतीने सुरक्षित वावर ठेवला आहे त्यापुढे तो कायम तसाच राहील याची काळजी घ्यायची आहे.  महाराष्ट्रात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा त्याचे काम करीत आहे. नागरिकांनी त्यांना या काळात सहकार्य करणे अपेक्षित आहे. दुसऱ्या लाटेच्या निम्मिताने प्रशासनाने अनेक गोष्टीचे नियोजन करून ठेवले आहे. त्याच्या फायदा आता नाही झाला तरी येत्या काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसऱ्या लाटेतील हे युद्ध संपल्यानंतर मात्र आता नागरिकांनी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून कोरोनाची साथ वाढू नये यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. नाहीतर तिसरी लाट येणार आणि त्याचा नाहक त्रास नागरिकांना भोगावा लागेल.