लॉकडाऊन संपणार कधी? 14 एप्रिलनंतर सर्व सुरळीत होईल ना? खूप कंटाळा आलाय, अजून किती दिवस घरात बसायचे? असे विविध प्रश्न सध्या सर्वसामान्य नागरिकांना पडले आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा त्यांचा दिवसभर प्रयत्न सुरु असतो. परंतु, त्यांच्या मनाचं समाधान होईल असं उत्तर त्यांना अजून तरी काही सापडलेलं नाही. कोरोना किती गंभीर स्वरूप धारण करतोय यांच्याकडे ते सोयीस्कररित्या डोळेझाक करीत आहेत. परंतु, ज्या वेगात कोरोनाचा फैलाव अख्या देशात आणि देशाबाहेर होत आहे, त्यामध्येही संपूर्ण देशात कोरोनाची लागण झालेले सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आजच्या घडीला आपण 500 चा आकडा पार केला असून अजूनही रुग्ण संख्येत वाढ होतेच आहे. तर कोरोनामुळे महाराष्ट्रात मृतांची संख्याही 26 झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात ही परिस्थिती, अशा वेळी लॉकडाऊन संपुष्टात आणलं तर काय होईल यांची कल्पनाही न केलेली बरी, काही महाभाग आजही रस्त्यावर विनाकारण रस्त्यांवरील मोकळ्या 'सफारीचा' आनंद लुटताना दिसत आहेत.


यामुळे आपण घाबरून जायचं काहीच कारण नाही. मात्र, सतर्क राहून परिस्थितीशी मुकाबला केला पाहिजे. रुग्णांचा आकडा वाढणार यामध्ये नवल असं काहीही नाही, टेस्टिंग लॅबची संख्या वाढली आहे. अनेक रुग्ण तपासणी करू लागलेत, त्यामध्ये आरोग्य यंत्रणेला अपेक्षित असणारे रुग्ण सापडतायत. खरं तर ही चांगली बाब आहे, रुग्ण सापडल्याने वेळच्या वेळीच त्यांच्यावर आरोग्य यंत्रणा उपचार करीत आहे. त्यामुळे या संसर्गाचा फैलाव होत नाही, उलट त्याला वेळीच अटकाव होतोय, हे आपल्या आरोग्य यंत्रणेचं यश आहे. त्यांचे खरं तर याकरिता आभार मानले पाहिजेत. अशा काळात संशयित रुग्ण शोधून लढणं त्यांच्यावर उपचार करणं हा एक मोठं 'टास्क' असतो पण आपले डॉक्टर्स, परिचारिका, आशा वर्कर आणि वैद्यकीय सहायक त्यांचे काम व्यवस्थित पार पाडत आहेत.


खरं तर आपण वास्तव मान्य करायला हवं, आज जर देशाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या संकेत स्थळाला भेट दिली तर आपल्या लक्षात येईल की, संपूर्ण देशामध्ये सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण असण्याचा मान हा महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे. याकरिता त्याला तशी शास्त्रीय कारणं सुद्धा आहेत. यामध्ये महत्वाचं कारण म्हणजे, देशाची आर्थिक राजधानी मानली जाणारी मुंबई ही सुद्धा महाराष्ट्रात आहे. त्यामुळे परदेशातून जे नागरिक मायभूमीमध्ये परतले त्यामध्ये मुंबई मध्येच राहणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहेत. त्यामुळे पहिला टप्प्यात जर आपण बघितलं असेल तर जे काही कोरोनाबाधित रुग्ण सापडले ते बहुतांश करून परदेशातून आलेलेच होते.


लॉकडाऊन वाढविण्यात ना केंद्र शासनाला ना राज्य सरकारला रस आहे. उलट या सर्व प्रक्रियांमध्ये राज्याच मोठा महसूल, कर बुडत आहे. मात्र, अशावेळी राज्य सरकार नारिकांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून निर्णय घेत असते. 14 एप्रिलला काय घोषणा होईल हे आता सांगणे कठीण आहे, त्या वेळी असणाऱ्या परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेईल. काही राज्यातील लॉकडाऊन उठविण्याची घोषणा होईल किंवा कायम करण्यात येईल हे येणाऱ्या परिस्थितीवर अवलंबून आहे. अजून नऊ दिवस बाकी आहेत.


मात्र, महाराष्ट्र राज्याचा निर्णय घेताना नक्कीच आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, कारण दिवसागणिक महाराष्ट्रातील रुग्णांचा आकडा वाढत आहे. इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्याची परिस्थिती वेगळी आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. मुंबईतील अनेक विभाग आजही सील करण्यात आले आहे. त्यामुळे थोडा आणखी वेळ लागला तरी चालेल मात्र या कोरोनाचं संकट आटोक्यात आल्याशिवाय लॉकडाऊन उठविणे आपल्या राज्याला परवडणारे नाही. काहीजण राज्यातील ज्या भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले नाही ते जिल्हा चालू करण्यास हरकत नाही असा विवाद करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, यामध्ये लॉकडाऊनचं गांभीर्य हरवून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.


लॉकडाऊन म्हणजे काय? हे पुन्हा एकदा आता सांगण्याची गरज आहे असं दिसून येतंय. लॉकडाऊन म्हणजे नागरिकांनी आपण जिथे आहोत तो आपला परिसर सोडून दुसरीकडे जाता येत नाही. त्यामुळे या विषाणूचा संसर्गचा अटकाव करण्यास मदत होते. संपूर्ण जगामध्ये जेथे या विषाणूचा फैलाव झाला आहे, त्या सर्व देशामध्ये लॉकडाऊनचा पर्याय हा अवलंबला गेला आहे. आपल्या देशामध्येही लॉकडाऊन केल्यानंतर राज्याच्या बॉर्डर सील करण्यात आल्या आहेत. तर अनेक राज्यांनी आपल्या जिल्ह्याच्या बॉर्डर सील केल्या आहेत. ज्या ठिकाणी या कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत त्यांना त्याच ठिकाणी आपली आरोग्य व्यवस्था त्यांच्यावर उपचार करीत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये या आजारावर उपचार देण्याकरिता स्वतंत्र अशी रुग्णालये चालू केली आहेत. यामुळे या संसर्गाचा प्रादुर्भाव होत नाही. जर उदाहरण द्यायचं झालं तर, समजा मुंबईमध्ये कोरोनाचे जे रुग्ण सापडले आहेत तर त्यांच्यावर तेथेच उपचार केले जात आहे. मुंबईतील कुणालाही विनाकारण नाशिकमध्ये जाऊ दिले जात नाही. कारण उगाच मुंबई मधील कोरोनाबाधित रुग्णाचा प्रादुर्भाव त्या नाशिक जिल्ह्यामध्ये होऊ नये हा त्यामागे हेतू असतो. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे.


आपल्याला जर निरोगी राहायचं असेल तर आपल्याला संयम बाळगला पाहिजे. कारण जीवापेक्षा मोठं काही नाही. या आलेल्या संकटाला सगळयांना मिळून सामोरे जायचे आहे. राज्य शासन त्यांचा पद्धतीने काम करीत आहेत, योग्य त्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. आपल्याला आत्मविश्वास असला पाहिजे की, या परिस्थितीतून आपण लवकरच सगळे सही सलामत बाहेर पडू.


संतोष आंधळे यांचे संबंधिक ब्लॉग


BLOG | सारे जमीन पर ...



BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना

BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क

BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा

BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...

सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?

BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!



BLOG | कोरोना होणं म्हणजे गुन्हा नाही!