एक बाजूला डॉक्टर जीवाची बाजी लावून कोरोना ( कोविद-19) बाधित रुग्णांना उपचार देत आहे. तर दुसऱ्या बाजूला देशातील विविध भागात डॉक्टर्स आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांवर लोकं हल्ला करत आहे. हा हल्ला करायचं कारण काय तर, कोरोना संशयित रूग्णांची तपासणी करून वैद्यकीय सल्ला देण्यासाठी त्यांच्या घरी जाणं, हाच काय तो त्यांचा गुन्हा. रुग्णांचा जीव वाचावा, विषाणूच्या संसर्गाचा फैलाव कुठे होऊ नये, सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी केलेल्या मेहतनातीचं फळ म्हणून लोकांच्या शिव्या, त्यांची धक्काबुक्की आणि वेळ प्रसंगी दगडाचा मार खायला डॉक्टर आणि त्यांचे सहकारी तुम्हाला काय 'हलवा' वाटले काय, की कुणी पण यावे आणि हल्ला करून जावे. या डॉक्टरांसोबत पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. सरकारने आता डॉक्टरांना संरक्षण द्यावं, नाही तर उद्या डॉक्टर रुग्णाचं संरक्षण करण्याकरिता उपलब्ध नसतील.

डॉक्टरांचा पेशा हा रुग्णाला उपचार देण्याचा आहे, त्याचं ते काम करीत आहेत. परंतु अशा भीतीदायक वातावरणात डॉक्टरांकडून अपेक्षा करता काय त्यांनी मार खाऊन रुग्णांना उपचार देत राहायचे. डॉक्टरांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, जर असे हल्ले कायम चालू राहिले तर संपूर्ण देशात भयाण परिस्तिथी निर्माण होईल. आयुष्यभर अभ्यास करून डॉक्टर मार खाण्यासाठी जन्माला आलेला नाही. काही दिवसापूर्वी याचं कोरोनाशी युद्ध करणाऱ्या योध्यांसाठी संपूर्ण भारताने टाळ्या-थाळ्या वाचून आपली कृतज्ञता व्यक्त केली होती. त्या योध्यामध्ये डॉक्टर, त्यांचे सहकार, पोलिसांचे जवान यांचाही समावेश होता.

देशातील काही भागात हे हल्ले झाले असून, या प्रकरणात पोलिसांनी काही लोकांना अटकही केली आहे. डॉक्टर भयभीत वातावरणात काम करू शकत नाही, खरं तर आता नागरिकांनीच पुढे येणाची जबाबदारी असून अशाप्रकारे हल्लेखोरांना त्यांनीच विरोध करायला हवा. पोलीस किती ठिकाणी पुरे पडतील. नागरिकांनी या सर्व गोष्टींचा सारासार विचार करायला हवा. डॉक्टर, आशा वर्कर नागरिंकाच्या हिताकरिता गल्ल्या वस्त्यामध्ये जाऊन संशयित रूग्नांची पाहणी करत आहे. संशयित रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळाले तर त्यांच्यामुळे दुसऱ्यांना होणारी लागण वेळच्या वेळी थांबवू शकतो. डॉक्टर हे तुमचे दुष्मन नसून आज या महाकाय संकटातून ते आपल्याला वाचविण्यासाठी दिवस-रात्र काम करीत आहे. या काळात आपण त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे, त्यांना आपल्याकडून सहकार्याची गरज आहे. कोरोनाची लक्षणं लपवू नका, योग्य वेळी उपचार घ्या. स्वतः आणि कुटुंबाचा जीव वाचवावा.

कोरोना फक्त राष्ट्रीय आपत्ती नसून जागतिक आपत्ती आहे, इटली सारख्या देशाची या विषाणूमुळे झालेली वाताहत आपण पहिली आहे. त्या ठिकाणी 50 पेक्षा जास्त डॉक्टर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्युमुखी पडले आहेत. डॉक्टरी पेशाला जगात मोठा दर्जा आहे, त्यांचा आपण सगळ्यांनी सन्मान राखला पाहिजे. त्यामुळे आपल्यावर आलेल्या संकटाशी मुकाबला करण्याची ही वेळ आहे. त्यामुळे किमान आता तरी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून डॉक्टरांशी व्यवस्थित वागणं हे आपले कर्तव्य मानले पाहिजे.

याप्रकरणी प्रतिक्रिया देताना इंडियन मेडिकल असोसिएशन, राष्ट्रीय उपाध्यक्ष, डॉ. अनिल पाचनेकर सांगतात की, "देशभरात डॉक्टरांवर होणारे हल्ले याचा निषेधच व्हायला पाहिजे. आज डॉक्टर जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करीत आहे . याप्रकरणी आता सरकाने लक्ष घालून डॉक्टरांना कशाप्रकारे संरक्षण देता याचा मुख्य विचार केला पाहिजे. तसेच डॉक्टरांच्या हल्ल्यावर देशात कायदा करण्याची गरज आहे . अशा भीतीदायक वातावरणात डॉक्टरांना काम करणे अवघड होईल. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ राजन शर्मा लवकर केंद्रीय आरोग्य मंत्री यांच्याकडे लेखी निवेदन पाठवून डॉक्टरांना संरक्षण देण्याची मागणी करणार आहेत."

आज बहुतांश डॉक्टर्स त्यांचं काम इमाने इतबारे करत आहे. कोरोना सारख्या महाकाय संकटाशी लढा देण्यासाठी सगळ्यानी एकत्र येणाची गरज आहे, हे वाक्य आता रटाळ वाटावं इतक्या वेळा कानी पडलं आहे. मात्र तरीही वैद्यकीय पथकावरील हल्ल्यांच्या बातम्या मन विचलित करून जातात. अनेक सर्वसामान्य नागरिक या गोष्टीची चीड व्यक्त करीत आहे. डॉक्टर हे आपले आहेत, त्यांना 'सॉफ्ट टार्गेट' समजून हल्ला करू नका. उद्या जर त्यांनी आपल्यावर उपचार करायचे थांबविले तर काय होईल याची कल्पनाही न केलेली बरी. डॉक्टरांमध्ये मुक्तपणे काम करण्याचा विश्वास निर्माण होईल असे वातावरण तयार करणे ही आपणा सर्वांचीच जबाबदारी आहे.

संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग

BLOG | सारे जमीन पर ...


BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना

BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क

BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा

BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...

सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?

BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!

BLOG | कोरोना होणं म्हणजे गुन्हा नाही!