ब्लॉग: नवरात्र म्हणजे नऊ स्त्री शक्तींचं प्रतीक. आणि या नऊ दिवसांत आपण अशाच नऊ प्रेरणादायी स्त्रियांना उजाळा देतो आहोत. आजचा दिवस आपण अर्पण करतो त्या आईला, जिने हजारो अनाथ जीवांना फक्त छतच नाही दिलं, तर त्यांना माणूस म्हणून उभं केलं – आणि हे करताना, स्वतःचं संपूर्ण आयुष्य वेचून टाकलं... आई असणं हे नुसतंच जन्म देणं नसतं, तर आयुष्य देण्याची कला असते. अशीच एक विलक्षण स्त्री म्हणजे सिंधुताई सकपाळ. जी स्वतःच्या आयुष्यातल्या दुःखांना विसरून, इतरांच्या आयुष्यात आनंद पेरत गेली. कुणी तिला 'माई' म्हटलं, कुणी 'देवता', पण तिचं खऱ्या अर्थाने नाव पडलं – मातृत्वाची मूर्ती. संघर्षमय आयुष्याची सुरुवात
बालपण गरिबीत गेलं. शिक्षणाची आवड असूनही परिस्थितीमुळे ते पूर्ण होऊ शकलं नाही. लहान वयातच लग्न झालं आणि त्यानंतर आयुष्याने त्यांना कठोर परीक्षा दिली. अन्याय, उपेक्षा, घरातून हाकलणं अशा प्रसंगांतही त्यांनी हार मानली नाही. धैर्याचं उदाहरण सिंधुताई गर्भवती असताना त्यांना घराबाहेर काढण्यात आलं. त्यावेळी आधारासाठी कोणी नव्हतं. अशा परिस्थितीत त्यांनी गायीच्या गोठ्यात आपल्या मुलीला जन्म दिला. हा प्रसंग त्यांच्या आयुष्याचा वळणबिंदू ठरला. कारण त्या क्षणापासून त्यांनी स्वतःपुरतं जगणं सोडलं आणि इतर गरजूंच्या दुःखात सहभागी होण्याचा संकल्प केला. 'माई' बनण्याचा प्रवास
भटकंती करून, भिक्षा मागून, गायन करून त्यांनी जगणं सुरू ठेवलं. पण लवकरच त्यांच्या आयुष्याचं ध्येय वेगळं ठरलं ते म्हणजे अनाथ मुलांचं संगोपन. रस्त्यावर, स्टेशनवर, समाजाच्या कडेला फेकलेली लेकरं त्यांनी उचलली आणि आपल्या लेकरांसारखा त्यांनी सांभाळ केला. यामुळे त्यांना सर्वजण "माई" म्हणून ओळखू लागले. मातृत्वाची मूर्ती
सिंधुताईंच्या आश्रमातून आज हजारो मुलं समाजात सक्षम आणि स्वावलंबी झाली. या मुलांनी आता समाजात आपली स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी केवळ आधार दिला नाही, तर त्यांना शिक्षण, संस्कार आणि उभं राहण्याची हिंमत दिली. त्याग, मातृत्व आणि धैर्याचं असं अद्भुत मिश्रण क्वचितच दिसतं. प्रेरणा आजच्या पिढीसाठी
सिंधूताईंची अर्थात माईंची कथा शिकवते की संकट कितीही असली तरी जिद्द आणि धैर्य असेल तर आपण स्वतःसह इतरांचं आयुष्य बदलू शकतो. सिंधुताईंच्या जीवनातली खरी देवी मूर्ती म्हणजे मानवतेचं मातृत्व. नवरात्रीत आपण ज्या देवीच्या विविध रूपांची पूजा करतो, त्याचं जिवंत रूप आपल्या काळात दिसलं ते सिंधुताई सकपाळ यांच्या रूपानं. त्यांचं आयुष्य म्हणजे चिकाटी, धैर्य आणि ममता यांचं दैवी मिश्रण आहे.
हेही वाचा
BLOG : नवरात्री विशेष | भाग 3 : सरला शर्मा – आकाश जिंकणारी पहिली भारतीय महिला