३ नोव्हेंबर, २०२४ - किवींकडून ०-३ ने दारुण पराभव२६ नोव्हेंबर, २०२५ - दक्षिण आफ्रिकेकडून ०-२ ने धुव्वा
एका वर्षाच्या अंतराने फक्त प्रतिस्पर्धी वेगळा, निकाल तोच. भारताला व्हाईटवॉश.
मायदेशातील भारतीय संघाची ही कामगिरी तुम्हाआम्हाला प्रचंड व्यथित करणारी आहे तशीच ती बरेच प्रश्न निर्माण करणारीही आहे. आपल्या खेळपट्ट्यांवर,आपल्या प्रेक्षकांसमोर आपलं नाक पाहुण्यांनी येऊन ठेचलंय. ज्या खेळपट्ट्यांवर धावांच्या राशी घालून आपण प्रतिस्पर्ध्यांना डावाने चिरडून टाकत असू, तशाच पिचवर परदेशी टीम आपल्याला लीलया पराभूत करतायत. अनेकदा तर डावामध्ये दोनशेचा टप्पा गाठतानाही आपला घामटा निघालाय. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटींमधील सहा डावांचा आपला स्कोअर पाहा... 46, 462, 156, 245, 263, 121...तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत हीच आकडेवारी 189, 93, 201, 140 अशी आहे. म्हणजे फक्त एकदा चारशेपार तर १० पैकी तीनदा दोनशेपारची मजल आपण मारू शकलो. गुवाहाटी कसोटी सामन्यातील आणखी एक आकडेवारी बरंच काही सांगून जाणारीआहे. दक्षिण आफ्रिकेने ४८९ चा पल्ला गाठताना तब्बल १५१.१ ओव्हर्स किल्ला लढवला. त्याच खेळपट्टीवर भारताने पहिल्या डावात ८३.५ तर दुसऱ्या डावात फक्त ६३.५ षटकं टिकाव धरला. म्हणजे दोन्ही डावांत मिळून १४६ च्या आसपास षटकं आपण खेळलो. त्यांच्या एका डावातील ओव्हर्सपेक्षा ही आकडेवारी कमी आहे.
इंग्लंड भूमीवर गिलच्या नेतृत्वाखालील टीमने तगडी फाईट देत १-२ अशा पिछाडीवरून २-२ अशी बरोबरी साधली होती. त्याच टीमची ही गत का झाली? आपल्या खेळपट्ट्यांवर आपली रणनीती का फसली? आपण पाहुण्यांना कमी लेखलं की खेळपट्टीचं आकलन करण्यात कमी पडलो? का संघनिवड चुकली? या प्रश्नांनी आता डोकं वर काढलंय. फिरकीला पोषक खेळपट्ट्यांवर आपल्या घरच्या मैदानात समोरच्या टीमचा ऑफ स्पिनर हार्मर अवघ्या दोन कसोटींमध्ये १७ विकेट्स काढत मालिकावीर होतो. तिथे आपले अक्षर, जडेजा, वॉशिंग्टन, कुलदीप या सर्व फिरकी गोलंदाजांनी मिळून दोन कसोटी सामन्यांमध्ये २१ च्या आसपास विकेट्स घेतल्यात. म्हणजे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हींमध्ये आपली कामगिरी घसरलीय हे स्वीकारावं लागेल. आपला संघ ट्रान्झिशन पीरीयडमधून जातोय. पुनर्बांधणी होतेय मान्य. त्यात गिल दुसऱ्या मॅचसाठी उपलब्ध नव्हता. पहिल्या मॅचमध्येही त्याचा सहभाग नसल्यासारखाच होता, हेही मान्य. तरीही आपल्याच मैदानात आपण साधी लढतही देऊ शकलो नाही, हे जीवाला लागतंय. १० तास, १२ तास बॅटिंग करून सामना वाचवण्याचे दिवस आता सरले हे स्वीकारूनही आपण जी अवसानघातकी फलंदाजी केलीय, जे फटके खेळलोय, ते जास्त जिव्हारी लागणारं आहे.
सचिन, द्रविड, गांगुली, सेहवाग, लक्ष्मण नंतरच्या पिढीत कोहली, रोहित, पुजारा या लिस्टमध्ये रहाणेचंही नाव घ्यावं लागेल. या मंडळींच्या शूजमध्ये पाय ठेवणं सोपं नाही, याची आपल्याला नक्कीच जाणीव झाली असणार. वनडे क्रिकेटचं वाढलेलं प्रमाण, आयपीएलसारख्या स्पर्धा, त्यातूनही वाढणारी टी-ट्वेन्टीची लोकप्रियता या साऱ्या गोष्टी क्रिकेट फॅन्ससाठी, स्पॉन्सर्ससाठी, क्रिकेट बोर्डांसाठी आवश्यक आहेतच. त्याला विरोध असण्याचं कारण नाही. त्याच वेळी पारंपरिक कसोटी क्रिकेटचा वसा मात्र आपण जपायला हवा.तो जपताना अत्यंत गांभीर्याने संघ बांधणीची प्रक्रिया व्हायला हवी. किवींसोबतच्या कसोटी मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि शुभमन गिल तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला. कसोटी टीमची पुनर्बांधणी करताना अशा तगड्या टीम्ससोबत अशा सतत होणाऱ्या प्रयोगांनी काय साधणार?
क्रिकेट समालोचक हर्ष भोगले आणि माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसादच्या एक्स पोस्टही विचार करायला लावणाऱ्या आहेत. हर्ष भोगले म्हणतात, या कसोटी दर्जाच्या खेळासाठी काही खेळाडू अजूनही तयार नाहीयेत. प्रश्न हा आहे की, खरंच किती तयार आहेत? तर वेंकटेश प्रसाद यांनी अष्टपैलू खेळाडूंवर भाष्य केलंय. ते म्हणतायत, एखाद्या खेळाडूला अष्टपैलूचा टॅग लावत तुम्ही अकरा खेळाडूंमध्ये घेता आणि त्याला पुरेशी गोलंदाजी करायला देत नाही हे अनाकलनीय आहे. वनडे क्रिकेटमध्ये आपण राज्य करतोय. टी-ट्वेन्टीतही आपण सिंहासनावर आहोत, तर इथे कसोटी क्रिकेटमध्ये अजिंक्यपद स्पर्धेची फायनल आपण दोनदा गाठलीय. मग गेल्या दीड वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये मायदेशात खेळताना आपण इतके का गटांगळ्या खातोय? वर उल्लेख केल्याप्रमाणे संघ पुनर्बांधणी प्रक्रियेतून जातोय हे खरंय. क्रिकेट हे ऊन-पावसासारखं आहे. कधी पराभवाच्या उन्हाचे चटके तर कधी विजयाचा, चाहत्यांचा प्रेमाचा पाऊस हा पडणारच. असं असलं तरीही पराभवातही प्रतिस्पर्ध्याचा घामटा काढल्याची शान असावी, माझा आक्षेप हरण्याला नाहीये. हरण्याच्या पद्धतीला आहे. पुढची कसोटी मालिका पुढच्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये आहे. आपल्या हातात पुरेसा वेळ आहे. अपेक्षा ही आहे की, कसोटी क्रिकेटमधलं हे पराभवाचं मळभ लवकरात लवकर दूर होईल आणि उमेदीचा नवा सूर्योदय होईल. त्या क्षणाची आपण सारेच क्रिकेटरसिक वाट पाहतोय.