India vs England: टी-ट्वेन्टी, वनडेच्या इन्स्टंट जमान्यात कसोटी सामनेही खमंग आणि लज्जतदार होतात हे ओव्हलवर झालेल्या भारत-इंग्लंड मॅचने दाखवून दिलं. पावसाचा लपंडाव सुरु असताना ही कसोटी पाचव्या दिवसापर्यंत पोहोचली. कसोटी क्रिकेटचा थरार बघा, शेवटच्या सेशनपर्यंत कळत नव्हतं, या मॅचचा आणि मालिकेचा निकाल काय लागणार...असेच सामने कसोटी क्रिकेटची शान कायम राखतील हे नक्की. एरवी तीन-चार दिवसात संपणारे कसोटी सामने बऱ्याच कालावधीनंतर या मालिकेत प्रत्येक वेळी पाचव्या दिवसापर्यंत गेले. अखेरच्या सत्रात भारताने खास करून भारतीय वेगवान माऱ्याने जी जीव तोडून गोलंदाजी केली, त्याला तोड नाही. ८० हून अधिक षटकं जुना चेंडू सिराजने अप्रतिम स्विंग केला. आदल्या दिवशी ब्रुकचा कॅच पकडून त्याने बाऊंड्री लाईन पार केली होती. तसंच लॉर्डस कसोटीत त्याच्याच बॅटला लागून चेंडू स्टम्पवर गेला तेव्हा २२ धावांनी इंग्लंडची नैया पार झाली होती. या दोन क्षणांची बोच त्याच्या मनात नक्की असणार. त्याचं सगळं उट्ट त्याने फेडलं. धोकादायक स्मिथला त्याने ज्युरेलच्या हाती सोपवत पाचव्या दिवशी इंग्लंडच्या तंबूत घबराट निर्माण केली. तर प्रसिध कृष्णाने फिल्डिंग डीप लावून टंगला यॉर्करवर गंडवलं.
सामन्याची उत्कंठा आणखी शिगेला पोहोचली जेव्हा सिराजचा टोलवलेला चेंडू आकाशदीपच्या हाती विसावण्याऐवजी बाऊंड्री पार गेला. त्यावेळी मैदानात अॅटकिन्सनसोबत वोक्स होता. जो निखळलेल्या खांद्याने पण, कणखर मनाने मैदानात उतरलेला.त्याने जेव्हा दोन-तीन धावा धावून काढल्या तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरची वेदना स्पष्ट दिसत होती. तरीही तो देशासाठी, संघासाठी मैदानात उतरला. त्याच्या त्या फायटिंग स्पिरीटला क्रिकेटरसिकांसह खेळाडूंनीही दाद दिली. याआधी अशी झुंजार वृत्ती पंतने दाखवलेली. क्रिकेटचा हा खेळ अशा झोकून देणाऱ्या खेळाडूंमुळेच वेगळी उंची गाठत असतो. ओव्हलच्या मॅचमध्ये एकीकडे अॅटकिन्सन हार मानायला तयार नव्हता तर दुसरीकडे सिराजही इरेला पेटलेला. एरवी बुमरा असताना त्याला साईड हीरोची भूमिका मिळत असते. यावेळी तोच सिराज मेन हिरो झाला. नव्हे या मालिकेतच त्याने वाघाचं काळीज घेऊन गोलंदाजी केली. न थकता, मनोधैर्य खच्ची न होऊ देता. सिराजने अॅटकिन्सनला क्लीन बोल्ड केलं तेव्हा एखादी वनडे किंवा टी-ट्वेन्टी पाहताना मन शहारून जातं तसे रोमांच अंगावर उभा राहिले. हर्षा भोगले आणि टीमने केलेला कॉमेंट्री करताना केलेला विजयोत्सव, सुनील गावसकर यांनी आपल्या लकी जॅकेटबद्दल आवर्जून उल्लेख करत व्यक्त केलेला आनंद. सारं काही विलक्षण होतं. ही मालिकाच एकूणात जबरदस्त झाली.
गेल्या कसोटी मालिकांमधील खास करून किवींविरुद्धचा मायदेशातील कसोटी मालिकेतला ०-३ चा पराभव आपली भळभळती जखम होता. त्यात कांगारूंच्या भूमीवरही आपण मालिका गमावली. विराट, रोहितनी कसोटी क्रिकेटमध्ये बॅट म्यान केली. तेव्हा शुभमन गिलच्या रुपात नवा कर्णधार, ताज्या दमाच्या अनेक खेळाडूंसह इंग्लंड भूमीवर स्वारी करायला गेला. मायदेशातील मालिकेत तगडी बॅटिंग लाईनअप, त्यात स्टोक्ससारखा कडक ऑलराऊंडर असलेल्या इंग्लंड संघाकडून भारताची परीक्षा पाहिली जाणार हे नक्की होतं. त्यात बुमरा फिटनेसमुळे सर्व कसोटी सामने खेळणार नाही हेही नक्की होतं. आकाशदीप, कृष्णासारखे नवखे वेगवान गोलंदाज इंग्लिश वातावरणात कसं जुळवून घेतील. साई सुदर्शन, करुण नायर मधल्या फळीत कसे खेळतील, अशा अनेक प्रश्नांचा अवघड पेपर आपल्या समोर होता. आपण हा पेपर अत्यंत कुशलतेने सोडवला. मुख्य म्हणजे गेल्या दोन कसोटी मालिकांमध्ये ज्या फलंदाजीने आपला घात केला, त्याच फलंदाजीने सातत्याने धावांचा रतीब घातला. राहुलचं सातत्य, जैस्वालचा आक्रमक बाणा याला गिलच्या धावांच्या धबधब्याची साथ लाभली. मधल्या फळीत रवींद्र जडेजाने आपल्या निग्रहपूर्वक फलंदाजीने सातत्याने अडचणीच्या काळात फायर ब्रिगेडचं काम केलं. त्याने वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने एक कसोटी वाचवली, तिथेच कुठेतरी मालिका बरोबरीत आणण्याच्या जिद्दीची वात पेटली असावी. पंत जायबंदी झाल्यावर टीममध्ये आलेल्या ज्युरेलने अप्रतिम विकेटकीपिंग केली.
ओव्हलच्या कसोटीत ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाची रिपरिप अशा परिस्थितीत विकेट किपिंग करणं सोपं नसतं. त्यात मध्येच पावसामुळे मॅच थांबणार, थोड्या वेळाने सुरु होणार. अशा ब्रेक ब्रेकने होणाऱ्या खेळावेळी एकाग्रता राखणं महाकठीण असतं. खास करुन किपिंग करताना. ज्युरेलने कसोटी सामन्यांचा फारसा अनुभव गाठीशी नसताना ही गोष्ट सहज साध्य करून दाखवली. वॉशिंग्टन सुंदरने गेल्या दोन कसोटीत आपण वेगवेगळ्या गियरमध्ये खेळू शकतो, ते दाखवून दिलं. गेल्या मॅचमध्ये जडेजाच्या साथीने बॅटिंग करताना त्याने बर्फाला लाजवणारा थंडपणा दाखवला तर या ओव्हलच्या मॅचमध्ये अखेरचा फलंदाज हाताशी उरलेला असताना त्याने प्रतिहल्ल्याची आग पेटवत इंग्लिश गोलंदाजीवर जाळ काढला. या खेळीने आपला स्कोअर चारशेच्या जवळ पोहोचण्यात मोलाची भूमिका बजावली. या मालिकेतील परफॉर्मन्सने मोठ्या कालावधीसाठी अव्वल दर्जाचा कसोटीपटू तसंच एक उपयुक्त ऑलराऊंडर होण्याकडे त्याने आगेकूच केलीय.
गिलचं कर्णधारपदावर टाकलेलं खणखणीत पाऊल, आकाशदीपचा उदय, बुमराच्या अनुपस्थितीत सिराजने एक पायरी पुढची चढणं, वॉशिंग्टनचं सुंदर टेम्परामेंट अशा अनेक सुखावणाऱ्या बाबींनी या मालिकेत आपल्याला भरभरून आनंद दिलाय. गेल्या दोन कसोटी मालिकांमधील पराभवाच्या जखमांवर या मालिकेने आशादायी फुंकर घातलीय. अखेरच्या मॅचनंतर प्रेझेंटेशनवेळी गिल फार सुंदर वाक्य बोलला. त्याला आथरटनने विचारलं गेल्या सहा आठवड्यांमधून तू काय शिकलास? गिल म्हणाला, कधीही हार मानायची नाही, मॅच सोडायची नाही. हा लढाऊ बाणाच आपल्याला कसोटी क्रिकेटमध्ये भविष्यात नव्या शिखराकडे घेऊन जाईल. ज्यासाठी गिल आणि त्याच्या टीमला शुभेच्छा देऊया.