Ind vs Eng 5th Test Match: दोन बाद शून्य. ३११ धावांची पिछाडी. सामन्याची साडेचार-पाच सत्रं बाकी. पराभव आ वासून उभा. अशा स्थितीतून गिलच्या भारतीय टीमने झुंजार खेळ करत कमबॅक केला आणि मॅच ड्रॉ केली. आता साऱ्यांच्या नजरा लागल्यात उद्यापासून सुरु होणाऱ्या ओव्हलवरच्या निर्णायक लढाईकडे.

Continues below advertisement

गेल्या कसोटीत टिपिकल टेस्ट मॅच बॅटिंगचं दर्शन आपण घडवलं. नांगर टाकणे, हा शब्दप्रयोग आपण सार्थ ठरवला. आकडेवारीच तसं सांगतेय, दुसऱ्या डावात तब्बल १४३ ओव्हर्स आपण खेळपट्टीवर पाय रोवून उभं होतो. राहुलने ३००, गिलने ३७९, वॉशिंग्टन सुंदरने २९८ तर जडेजाने २१८ मिनिटं चिवटपणे फलंदाजी करत इंग्लिश गोलंदाजीचा अंत पाहिला. तीच निराशा बहुदा स्टोक्सच्या वागणुकीतून शेवटी दिसून आली. पराभवाच्या जबड्यातून आपण ड्रॉचा निकाल खेचून आणला. हा आपला मानसिक विजय आहे. पण, आता हा इतिहास झालाय. आता फ्रेश दिवस, फ्रेश सामना.

मानसिक कणखरतेची कसोटी पाहणारे चार सामने झाल्यावर आपण ओव्हलवर मालिकेत बरोबरी साधण्यासाठी उतरतोय. वर्कलोडचा विचार करता बुमरा खेळणार नाही हे जवळपास नक्की आहे. त्या स्थितीत संघाचं गोलंदाजीचं समीकरण कसं असेल याबद्दल चर्चेने जोर धरलाय. बुमराऐवजी आकाशदीपचं तिकीट कन्फर्म आहे. तर, आपला फलंदाजीचा फॉर्म पाहता शार्दूल किंवा कंबोजऐवजी आपण कुलदीपला खेळविण्याचा विचार करू शकतो. दुखापतग्रस्त पंतच्या जागी ज्युरेल विकेटकीपरची जबाबदारी सांभाळेल. पंतचा एक्स फॅक्टर आपण मिस करू. पण, याच पंतने मागच्या वेळी दुखापतग्रस्त होऊनही मैदानात उतरण्याची हिंमत आणि जिद्द दाखवलेली. त्या जिद्दीची वात मनात तेवत ठेवूनच आपण या मैदानात उतरू अशी अपेक्षा. जैस्वाल, राहुल, गिल तिघंही उत्तम फॉर्मात आहेत.

Continues below advertisement

साई सुदर्शननेही आपली चुणूक दाखवलीय. जडेजाही भन्नाट बॅटिंग फॉर्ममध्ये आहे. वॉशिंग्टन सुंदरचा आत्मविश्वास शतकी खेळीनंतर आभाळाला टेकलेला असणार हे निश्चित. बॅटिंगमधला कॉन्फिडन्स त्याला गोलंदाजीवेळीही उपयुक्त ठरेल. इंग्लंडसाठी स्टोक्स न खेळणं मोठा धक्का आहे. खांद्याच्या दुखापतीने तो त्रस्त आहे. त्याची अनुपस्थिती केवळ कर्णधार म्हणून नव्हे तर फलंदाज तसंच गोलंदाज म्हणूनही भासेल. ओली पोपकडे निर्णायक लढाईत संघाची कमान आलीय. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि कार्सनाही विश्रांती मिळणार आहे.अॅटकिन्सन, ओवर्टन आणि टंग वोक्सच्या साथीने गोलंदाजीचा भार सांभाळतील. तर, बॅथेल रूटच्या साथीने फिरकीची धुरा सांभाळेल. इंग्लंडची गोलंदाजीची फळी वोक्स वगळता पूर्ण बदललेली असेल. तर, भारतीय संघाचा समतोलही पंतची दुखापत, बुमराची विश्रांती यामुळे बदललेला असणार आहे. यजमान इंग्लंड मालिकेत आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांना कसोटी ड्रॉ केली तरी चालणार आहे. याउलट बरोबरीसाठी आपल्याला जिंकावंच लागेल. रोहित शर्मा, विराट कोहलीसारख्या दिग्गजांच्या अनुपस्थितीत खेळताना शुभमन गिलच्या टीमला एक नवा इतिहास खुणावतोय. हा इतिहास लिहायला या टीमला शुभेच्छा देऊया.